अमित शाहांच्या हस्ते पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण
पुणे : Ajit Pawar Statue Unveiled in Pune दूध संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था, साखर कारखाने, नागरी सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राचे चालते-बोलते ज्ञानकोश होते. त्यांची कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उभारण्यात आलेल्या लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नेहरू मेमोरियल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात शाह बोलत होते.
अजितदादांच्या कार्याचे स्मरण करताना अमित शाह म्हणाले, अजितदादा अखेरपर्यंत पुणे जिल्हा, बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रश्नांसाठी आग्रही होते. सर्वोच्च पदावर पोहोचल्यानंतरही जमिनीशी नाळ जोडून ठेवणारे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांशी बांधिलकी जपणारे त्यांच्यासारखे नेतृत्व दुर्मीळ असते.
साखर कारखान्यांवरील प्राप्तिकराचा प्रश्न सोडविण्यासाठी अजितदादांनी सातत्याने पाठपुरावा केला. एखाद्या प्रश्नाचे महत्त्व ओळखून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कोविडच्या संकटकाळातील त्यांच्या कार्यतत्परता आणि नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुराव्यातून लोकांच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची आस्था आणि जबाबदारीची जाणीव दिसून येते, असे ते म्हणाले.
बारामतीच्या विकासात मोठा वाटा
बारामतीला देशातील सर्वाधिक विकसित मतदारसंघांपैकी एक बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विकासासाठीचे नियोजन, सातत्य आणि चिकाटीने उद्दिष्ट साध्य करण्याची त्यांची कार्यपद्धती अनुकरणीय होती. त्यांची ही कार्यपद्धती ही नव्या पिढीतील राजकीय नेतृत्वासाठी एका विद्यापीठाप्रमाणे आहे. लोकांशी संवेदनशीलतेने वागणे, कामाचे नियोजन, शिस्त आणि निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांची हातोटी नव्या पिढीने आत्मसात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिपच्या प्रवेशद्वाराचे ‘अजितदादा पवार प्रवेशद्वार’ नामकरण
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव देणे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याशेजारी त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारणे ही समाधानाची बाब आहे. या माध्यमातून पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याची ओळख होऊन प्रेरणा मिळेल, असेही शाह यांनी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, रवींद्र चव्हाण, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
Read About – Sugar Production – देशातील साखर उत्पादन दुपटीहून अधिक; महाराष्ट्राचा मोठा वाटा, 15 नोव्हेंबरपर्यंत 23.59 लाख टन उत्पादन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.