महिलांच्या ६५ किलो गटाच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या चेन निएन-चेनवर ३-२ ने मात; भारताला बॉक्सिंगमधील दुसरे सुवर्ण
ऐची-नागोया : Asian Games 2026 आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सर प्रवीण हुड्डाने महिलांच्या ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत तिने चिनी तैपेईच्या चेन निएन-चेनचा ३-२ असा पराभव केला. भारतासाठी बॉक्सिंगमधील हे दिवसातील दुसरे सुवर्णपदक ठरले. याआधी लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो गटात सुवर्ण जिंकले होते. प्रवीणसाठी हा विजय विशेष महत्त्वाचा आहे. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवले होते; मात्र डोपिंगविषयक ठरलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे ते पदक गमवावे लागले होते. यावेळी माजी विश्वविजेत्या चेनवर मात करत तिने सुवर्णपदक जिंकले.
अटीतटीच्या लढतीत ३-२ ने विजय
अंतिम सामन्याच्या सुरुवातीला प्रवीणने सावध खेळ केला. प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पंचना प्रत्युत्तर देत तिने प्रतिहल्ल्यांची संधी साधली. दोन्ही बॉक्सर्समध्ये सुरुवातीपासून चुरस पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत प्रवीणने पंचांचा ५-० असा कौल मिळवला. दुसऱ्या फेरीत तिने प्रतिस्पर्धीपासून योग्य अंतर राखत आपल्या लांबीचा फायदा घेतला. काही अचूक पंच मारून चेनचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेनने जोरदार पुनरागमन करत ही फेरी जिंकली. निर्णायक तिसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. चेनने काही वेगवान पंच मारले, तर प्रवीणने प्रतिहल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर दिले. अखेर पंचांच्या विभागलेल्या निर्णयात प्रवीणने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.
सेपकटकरॉमध्ये भारताला कांस्य
भारतीय पुरुषांच्या क्वाड्रंट संघाने सेपकटकरॉमध्ये कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत जपानकडून १२-१५, १३-१५ असा ०-२ पराभव झाल्याने भारतीय संघाला अंतिम फेरी गाठता आली नाही. मात्र, उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासामुळे भारताच्या खात्यात कांस्यपदकाची भर पडली. मालेमंगनबा सिंह सोरोखाईबाम, रामकुमार शर्मा, बॉबी कुमार आणि आकाश युमनाम यांचा भारतीय संघात समावेश होता. या स्पर्धेच्या गटफेरीत भारताने विश्वचषक विजेत्या म्यानमारला पराभूत केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सेपकटकरॉमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले.
तिरंदाजीत सुवर्ण आणि रौप्य
- महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात कुमकुम मोहोड, अंकिता भक्त आणि कीर्ती शर्मा यांच्या भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे पहिले पदक ठरले. अंतिम सामन्यात १७ वर्षीय कुमकुमने निर्णायक टप्प्यावर दोन अचूक ‘१०’ गुण मिळवत महत्त्वाची भूमिका बजावली.
- मिश्र रिकर्व्ह सांघिक प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मादेवरा यांना रौप्यपदक मिळाले. अंतिम फेरीत चीनच्या झू जिंगयी आणि ली मेंगची यांनी भारतीय जोडीचा ५-३ असा पराभव केला.
- पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात धीरज बोम्मादेवरा, यशदीप संजय भोगे आणि नीरज चौहान यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाने भारतावर ५-१ असा विजय मिळवला.
नौकानयनात नेत्राला कांस्य
भारतीय नौकानयनपटू नेत्रा कुमाननने महिलांच्या डिंगी प्रकारात कांस्यपदक पटकावले. अंतिम फेरीतील सुरुवातीच्या शर्यतीनंतर तिने पुढील शर्यतीत कामगिरी सुधारत पदक निश्चित केले. हाँगकाँगच्या स्टेफनी लुईस नॉर्टनसोबत तिचे गुण समान होते; मात्र परस्पर निकालाच्या आधारे नेत्राला कांस्यपदक मिळाले. याच दिवशी लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ७५ किलो गटात चीनच्या बाओ झियीचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारतीय बॉक्सिंग संघाच्या खात्यात प्रवीणच्या सुवर्णासह दिवसातील दोन सुवर्णपदकांची भर पडली. या कामगिरींसह भारताने ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण ७३ पदके मिळवली आहेत. त्यामध्ये १३ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३५ कांस्यपदकांचा समावेश आहे.
Asian Games 2026 – लोव्हलिना बोर्गोहेनला वाढदिवशी सुवर्णभेट; जपानशी खास नाते
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.