इलेक्ट्रिक वाहनांचा एकत्रित बाजारवाटा ४२ टक्क्यांवर
नवी दिल्ली : भारतातील पॅसेंजर वाहन (पीव्ही) बाजारात पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांकडे ग्राहकांचा कल (Auto Market Shift) वेगाने वाढत आहे. इक्वायरीस सिक्युरिटीज च्या ऑगस्ट २०२६ च्या अहवालानुसार, देशात पहिल्यांदाच सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक (ईव्ही) वाहनांची एकत्रित विक्री पेट्रोल गाड्यांच्या विक्रीपेक्षा जास्त झाली आहे.
ऑगस्ट २०२६ मध्ये जीएसटी (जीएसटी) दर कपातीमुळे वाहनांची परवडणारी किंमत आणि सुलभता वाढल्याने एकूण पॅसेंजर वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर १६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
इंधनानुसार विक्रीची टक्केवारी (ऑगस्ट २०२६)
पेट्रोल वाहने : पेट्रोल गाड्यांचा वाटा आतापर्यंतच्या निच्चांकी ४१ टक्क्यांवर घसरला आहे (गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तो ४६ टक्के होता).
सीएनजी वाहने : सीएनजी वाहनांचा वाटा वाढून २५ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे (गेल्या वर्षी २१ टक्के होता).
पर्यावरणपूरक वाहने : सीएनजी – हायब्रिड – ईव्ही या तिन्ही प्रकारच्या वाहनांचा एकत्रित वाटा ४२ टक्क्यांवर पोहोचला असून, त्याने पेट्रोल वाहनांना (४१%) मागे टाकले आहे.
इलेक्ट्रिक वाहने आणि प्रमुख कंपन्यांची कामगिरी
ऑगस्ट महिन्यात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत ५२ टक्क्यांची जोरदार वाढ झाली असून एकूण ३०,७०० युनिट्सची विक्री झाली. यामुळे देशातील एकूण वाहन बाजारात ईव्हीचा शिरकाव ७.७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
टाटा मोटर्स : टियागो ईव्हीच्या मागणीमुळे ईव्ही बाजारातील टाटाचा वाटा ४३ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा : ईव्ही बाजारात महिंद्राचा वाटा २१ टक्के राहिला.
जेएसडब्ल्यू एमजी मोटर : वाढत्या स्पर्धेमुळे एमजी मोटरचा वाटा घसरून १५ टक्क्यांवर आला.
मारुती सुझुकी : ईव्ही क्षेत्रात नवीन पदार्पण करूनही मारुतीने ५ टक्के वाटा मिळवला आहे.
दिल्ली अव्वल स्थानी
प्रादेशिक पातळीवर दिल्लीने देशात सर्वाधिक म्हणजेच १९ टक्के ईव्ही शिरकाव नोंदवला. यामध्ये टॅक्सी/फ्लिट नोंदणीचा मोठा वाटा असला, तरी व्यावसायिक वापर वगळताही दिल्लीतील ईव्ही वापर (१२-१४%) राष्ट्रीय सरासरीपेक्षा (७.७ %) खूप जास्त आहे.
ई-२० मुळे ईव्हीला मागणी
पेट्रोलमध्ये ई-२० इंधनाच्या संक्रमणामुळे ग्राहकांमध्ये असलेल्या काही शंकांमुळे सीएनजी, हायब्रिड आणि ईव्ही गाड्यांच्या विक्रीला मोठे पाठबळ मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
