अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
वाशिंग्टन : इराणच्या अत्यंत सुरक्षित अशा भूमिगत पिकॅक्स माउंटेन अणुप्रकल्पावर अमेरिका लवकरच हल्ला करू शकते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले होते, त्यानंतर हे वक्तव्य आले आहे. Trump Iran Warning
अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखणे हाच मुख्य उद्देश
इराणविरुद्ध गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या लष्करी मोहिमेचे ट्रम्प यांनी समर्थन केले. ते म्हणाले, या पाच महिन्यांत आम्ही काय केले माहीत आहे का? आम्ही इराणला अणुशस्त्रे बनवण्यापासून रोखले आहे. इराणकडे अणुबॉम्ब असणार नाही, कारण जर त्यांच्याकडे तो आला, तर आपण कोणीही इथे जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर या डोंगराळ भागात संशयास्पद हालचाली आढळल्या, तर अमेरिका तिथे त्वरित हल्ला करेल. आम्ही पिकॅक्सवर लवकरच हल्ला करू शकतो. तिथल्या प्रत्येक हालचालीवर आमची गुप्तहेर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. इराणमध्ये कुठेही काही गडबड झाली, तर आम्ही त्यांच्यावर जोरदार प्रहार करू.
काय आहे पिकॅक्स माउंटेन?
हा प्रकल्प इराणच्या नतांझ युरेनियम संवर्धन केंद्राजवळ असलेल्या डोंगराखाली अत्यंत खोलवर बांधण्यात आला आहे. यामध्ये दोन मोठ्या भुयारी यंत्रणा आहेत. इस्रायली गुप्तहेर यंत्रणेचा असा विश्वास आहे की इराणने आपली हजारो सेंट्रीफ्यूज यंत्रे या सुरक्षित भूमिगत भागात हलवली आहेत. इतक्या खोलवर असलेल्या या प्रकल्पावर सामान्य हवाई हल्ल्यांचा परिणाम होत नाही, ज्यामुळे येथे हल्ला करणे म्हणजे युद्धाचा मोठा भडका उडण्यासारखे आहे.
लष्करी कारवाईमुळे इस्रायल सुरक्षित
ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच मध्य पूर्वेतील मोठे युद्ध टळले आहे. जर आम्ही कारवाई केली नसती, तर आज इस्रायल आणि मध्य पूर्व देश अस्तित्वात राहिले नसते. यानंतर त्यांनी युरोपियन आणि अमेरिकन शहरांना लक्ष्य केले असते.
रडार यंत्रणा दोनदा केली उद्ध्वस्त
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने नुकतेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स च्या हवाई संरक्षण आणि अत्याधुनिक रडार यंत्रणांवर मोठे हल्ले केले होते. त्यांनी आणलेली अत्याधुनिक रडार यंत्रणा आम्ही एकदा नव्हे, तर दोनदा उडवून दिली आहे. आता ते नवीन रडार बसवण्यास कंटाळले असतील, कारण आम्ही ते लगेच उद्ध्वस्त करतो.
इराणचा पलटवार
इराणने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला असून अमेरिकेने त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांच्या सैन्याने पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांवर चोख प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत.
