Ad Advertisement Ad Advertisement

Avengers Doomsday Trailer – 56 कोटी व्ह्यूजचा विक्रम, तरीही ‘डूम्सडे’चा मुकुट हुकला

स्पायडर-मॅनने मारली बाजी, ट्रेलरच्या मैदानात मार्व्हल विरुद्ध सोनीची रंगली जबरदस्त लढत

मुंबई: Avengers Doomsday Trailer – एखाद्या चित्रपटाला सुपरहिट होण्यासाठी आधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित व्हावे लागते, असा एकेकाळचा समज आता मागे पडला आहे. कारण, आज चित्रपटाचा खरा जलवा त्याच्या ट्रेलरपासूनच सुरू होतो. काही मिनिटांच्या ट्रेलरवर कोट्यवधी प्रेक्षकांच्या नजरा खिळतात, सोशल मीडियावर चर्चेचे वादळ उठते आणि व्ह्यूजचे आकडे विक्रमांचे नवे शिखर गाठतात.

हॉलिवूडच्या सुपरहिरो विश्वात सध्या असाच एक महाविक्रमांचा खेळ रंगला आहे. मार्व्हलच्या बहुप्रतीक्षित ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’च्या अंतिम ट्रेलरने अवघ्या २४ तासांत तब्बल ५६३ दशलक्ष म्हणजेच ५६.३ कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. आकडा इतका मोठा की, अनेक चित्रपटांच्या संपूर्ण प्रमोशनल मोहिमेलाही हेवा वाटावा. मात्र, एवढा प्रचंड गाजावाजा करूनही ‘डूम्सडे’ला जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरचा मुकुट मिळवता आलेला नाही.

कारण, मैदानात आधीच ठाण मांडून बसलेल्या ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने तब्बल ७१८.६ दशलक्ष व्ह्यूजसह अव्वल स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे. त्यामुळे आता प्रश्न केवळ कोणत्या चित्रपटाचा ट्रेलर जास्त पाहिला गेला, एवढाच राहिलेला नाही, तर सुपरहिरोंच्या लोकप्रियतेच्या या महासंग्रामात बाजी नेमकी कोण मारणार, याची उत्सुकता वाढली आहे.

२४ तासांत ५६३ दशलक्ष व्ह्यूज, ‘डूम्सडे’ने इंटरनेटवर उडवली खळबळ

‘ॲव्हेंजर्स’ म्हटले की, डोळ्यांसमोर येतात ते थरारक युद्ध, अफाट शक्ती, अविश्वसनीय व्हिज्युअल्स आणि जगाला वाचवण्यासाठी एकत्र येणारे सुपरहिरो. या फ्रँचायझीची लोकप्रियता जगभरात किती प्रचंड आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’च्या ट्रेलरने दिली आहे.

चित्रपटाचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांनी त्यावर अक्षरश: उड्या घेतल्या. पहिल्या २४ तासांत ५६३ दशलक्ष व्ह्यूज मिळवत या ट्रेलरने लोकप्रियतेचा नवा टप्पा गाठला. विशेष म्हणजे, याच चित्रपटाच्या आधीच्या अधिकृत टीझरने पहिल्या २४ तासांत ५०३ दशलक्ष व्ह्यूज मिळवले होते. आता अंतिम ट्रेलरने स्वत:च्याच आधीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

म्हणजेच, ‘डूम्सडे’च्या बाबतीत चाहत्यांची उत्सुकता कमी होण्याऐवजी प्रत्येक नव्या झलकबरोबर वाढतच आहे. ट्रेलरमधील दृश्ये, कथेबद्दलचे तर्क-वितर्क आणि सुपरहिरो विश्वातील संभाव्य घडामोडी यांवर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ट्रेलर पाहून त्यातील प्रत्येक छोट्या तपशीलाचा अर्थ शोधण्याची चाहत्यांची धडपडही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

पण ट्रेलरचा खरा बादशहा तर ‘स्पायडर-मॅन’, डूम्सडेची झेपही पडली कमी

५६३ दशलक्ष व्ह्यूज मिळवूनही ‘डूम्सडे’ पहिल्या क्रमांकावर का पोहोचू शकला नाही? याचे उत्तर आहे ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे.’ सोनी पिक्चर्सच्या या चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरने पहिल्या २४ तासांत तब्बल ७१८.६ दशलक्ष व्ह्यूज मिळवले होते. त्यामुळे सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या ट्रेलरच्या यादीत स्पायडर मॅनने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
‘डूम्सडे’ आणि ‘ब्रँड न्यू डे’ यांच्यातील व्ह्यूजची तुलना केली, तर स्पायडर-मॅनचा ट्रेलर तब्बल १५५.६ दशलक्ष व्ह्यूजनी पुढे आहे. त्यामुळे ५६ कोटींचा आकडा गाठूनही डूम्सडेची पहिल्या क्रमांकाची खुर्ची हुकली आहे. एकीकडे मार्व्हलच्या ॲव्हेंजर्सची ताकद, तर दुसरीकडे स्पायडर मॅनची जगभरातील लोकप्रियता. या दोन सुपरहिरो विश्वांमधील ही डिजिटल लढाई चाहत्यांसाठी एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही.

ट्रेलर व्ह्यूजच्या शर्यतीत कोण कोणाला मागे टाकतेय? पाहा टॉप १० यादी

पहिल्या २४ तासांतील व्ह्यूजचा विचार केला, तर या यादीत सुपरहिरो चित्रपटांचा दबदबा स्पष्टपणे दिसतो. विशेष म्हणजे, पहिल्या तीन क्रमांकांमध्ये ‘स्पायडर मॅन’ आणि ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’चे ट्रेलर आहेत.

जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० चित्रपटांच्या ट्रेलरची यादी :

१. स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे (अधिकृत ट्रेलर) – ७१८.६ दशलक्ष व्ह्यूज
२. ॲव्हेंजर्स: डूम्सडे (फायनल ट्रेलर) – ५६३ दशलक्ष व्ह्यूज
३. ॲव्हेंजर्स: डूम्सडे (अधिकृत ट्रेलर)- ५०३ दशलक्ष व्ह्यूज
४. डेडपूल अँड वूल्व्हरीन (अधिकृत टीझर) – ३६५ दशलक्ष व्ह्यूज
५. स्पायडर-मॅन: नो वे होम (अधिकृत टीझर ट्रेलर) – ३५५.५ दशलक्ष व्ह्यूज
६. ॲव्हेंजर्स: एंडगेम (टीझर ट्रेलर) – २८९ दशलक्ष व्ह्यूज
७. ॲव्हेंजर्स: एंडगेम (अधिकृत ट्रेलर) – २६८ दशलक्ष व्ह्यूज
८. सुपरमॅन (अधिकृत टीझर ट्रेलर) – २५० दशलक्ष व्ह्यूज
९. ट्रान्सफॉर्मर्स: राइज ऑफ द बीस्ट्स (टीझर ट्रेलर) – २३८ दशलक्ष व्ह्यूज
१०. ॲव्हेजर्स: इन्फिनिटी वॉर (टीझर ट्रेलर) – २३० दशलक्ष व्ह्यूजया यादीकडे बारकाईने पाहिले, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. प्रेक्षकांच्या मनावर सुपरहिरो चित्रपटांनी किती घट्ट पकड निर्माण केली आहे. ‘ॲव्हेजर्स: डूम्सडे’चे दोन ट्रेलर पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आहेत. ‘ॲव्हेंजर्स: एंडगेम’चे दोन ट्रेलरही टॉप १० मध्ये आहेत. म्हणजेच, मार्व्हलच्या सुपरहिरो विश्वाची क्रेझ अजूनही कायम आहे. दुसरीकडे, स्पायडर मॅनने दोन चित्रपटांच्या माध्यमातून या यादीत आपली ताकद दाखवली आहे.

भारतातही ‘डूम्सडे’चा जलवा, चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

हॉलिवूडच्या या सुपरहिरो महासंग्रामाची उत्सुकता भारतीय चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, ‘ॲव्हेजर्स: डूम्सडे’ भारतात हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. जगभरात हा चित्रपट १८ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, भारतीय प्रेक्षकांना १७ डिसेंबरपासूनच तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी हा चित्रपट केवळ आणखी एक हॉलिवूड रिलीज नसून, वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. ट्रेलरच्या आकड्यांवरूनच चित्रपटाबद्दलची उत्सुकता किती शिगेला पोहोचली आहे, हे स्पष्ट होते. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही असाच धुमाकूळ घालण्यात ‘डूम्सडे’ यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

५६ कोटींचा आकडा की ७१ कोटींचा विक्रम? खरी लढाई आता बॉक्स ऑफिसवर

एका बाजूला ५६३ दशलक्ष व्ह्यूजचा विक्रम करणारा ‘ॲव्हेंजर्स: डूम्सडे’, तर दुसऱ्या बाजूला ७१८.६ दशलक्ष व्ह्यूजसह अव्वल स्थानावर असलेला ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ दोन्ही चित्रपटांची लोकप्रियता पाहता सुपरहिरो विश्वातील ही स्पर्धा आणखी रंगणार, यात शंका नाही.

मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ट्रेलरला मिळणारे व्ह्यूज म्हणजे चित्रपटाच्या यशाची केवळ पहिली झलक असते. खरा निकाल प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये किती गर्दी करतात आणि बॉक्स ऑफिसवर किती कमाई होते, यावर ठरतो. त्यामुळे ट्रेलरच्या व्ह्यूजचा विक्रम स्पायडर मॅनच्या नावावर असला, तरी डूम्सडेची खरी परीक्षा अजून बाकी आहे.

५६ कोटी व्ह्यूज मिळवूनही डूम्सडेचा नंबर १ चा मुकुट हुकला, पण स्पायडर मॅनचा विक्रम मोडण्याची महत्त्वाकांक्षा आता चाहत्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अखेर सुपरहिरोंच्या या महासंग्रामात डिजिटल जगाचा बादशहा स्पायडर मॅनच राहणार, की डूम्सडे बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास लिहिणार? याचे उत्तर डिसेंबरमध्ये मिळेल.

Read About: Gondhal Marathi Film Oscar 2027 – मराठी चित्रपटाची ऑस्करच्या दिशेने झेप

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.