Ad Advertisement Ad Advertisement

Next James Bond : बॉण्ड नेमका हवा तरी कसा?

Next James Bond : सुरुवातीलाच सांगतो, डॅनियल क्रेगचे नाव जेव्हा नवा बॉण्ड म्हणून जाहीर करण्यात आले तेव्हा तो जगभर पसरलेल्या बहुसंख्य बॉण्ड चाहत्यांना आवडला नव्हता. त्यात मीही एक होतो. क्रेग तेव्हा इतका परिचित चेहरा नव्हता. त्याचं नावही फारसं कानावर नव्हतं. पण, नंतर तो कसिनो रोयालमधून पडद्यावर आला आणि बॉस क्रेग छा गया…

बॉण्डची भूमिका करणारे रॉजर मूर, क्रेगसारखे कलाकार, आपल्याकडे देव आनंद यांना खरं तर वाढतं वय वगैरे निसर्गनियमांनी अडवायला नको. पण, जे चाहत्यांना नको तेच नेमकं विधाता घडवत असतो. आताही क्रेगने निसर्गनियमांसमोर माघार घेत निवृत्ती घेतल्यानंतर नवीन बॉण्ड कोण याची चर्चा नेहमीप्रमाणे सुरू झाली होती. भलभलते चेहरे, कलाकारांची नावे विश्वसनीय सूत्रांचे हवाले देत पुढे येत होती. चाहते नाक मुरडत होते आणि नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड… ही अजरामर लाईन रुपेरी पडद्यावर आता कोणता अभिनेता फेकणार असा ओळखा पाहू कोण बरे, कोण बरेचा खेळ सुरू असताना रॉबर्ट पॅटीन्सनचे नाव जाहीर करत त्याचे अधिकृत उत्तर नुकतेच बॉण्डपटांच्या निर्मात्यांनी दिले आहे…

आणि हे नाव ऐकल्यावर हॅऽऽऽ कायतरीच.. असा निराशादर्शक जागतिक हुंकारही बॉण्ड चाहत्यांकडून उमटला आहे. बॉण्डच्या स्टाईलमध्ये त्याला सादर करणाऱ्या एआयलाही त्याला बॉण्ड म्हणून प्रभावी पद्धतीने सादर करता आलेले नाही म्हणजे बघा. त्याची खिल्ली उडवणाऱ्या एआय चित्रफिती तर ढिगाने आल्यात. प्रत्येक चाहत्याला त्याचा त्याचा बॉण्ड हवा असतो आणि त्यासाठी त्याची विशिष्ट चौकटीतली मतं आहेत हे मात्र खरंय. त्यातही महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी मतं असू शकतात. मात्र तो रांगडा हवा, मर्दानी राकटपणा त्याच्यात हवा याबद्दल मात्र एकमत आढळते. खुद्द इयान फ्लेमिंगलाही त्याचा मानसपुत्र असाच अपेक्षित होता.

ब्रिटिश हेर खात्यात त्याने केलेल्या कामगिरीतून त्याला जेम्स बॉण्डची व्यक्तिरेखा सुचली होती. डेअर डेव्हील, धाडसी, जिवाची पर्वा न करणारा आणि ललनांना लिलया खेळवणारा बॉण्ड त्याने कथा-कादंबऱ्यांतून लिहिला आणि त्याचा हा मानसपुत्र अफाट वाचकप्रिय झाला. यथावकाश याच साच्यात त्याला पडद्यावरही आणले गेले. बॉण्डकथांच्या चाहत्यांना या चित्रपटांनीही झपाटले. आज कितीतरी वर्षे उलटली, इतक्या वर्षांत सहा कलाकारांनी बॉण्ड पडद्यावर साकारला. आता सातवा येतोय, पण बॉण्डपटांची मोहिनी मनावरून हटायला तयार नाही. कालगतीनुसार कलाकार बदलले, सहकलाकार बदलले, बॉण्डची व्यक्तिरेखाही बदलली. नव्याने लिहिली गेली. अनेक स्वभावछटा वर्तमान काळाला अनुसरून त्या व्यक्तिरेखेत मिसळल्या गेल्या. पुरुषी मानसिकतेचा बॉण्ड हे बदल सोसत मेट्रोसेक्शुअल झाला. इयान फ्लेमिंगची बॉण्ड मालिका संपल्यानंतर अनेक लेखकांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. काहींना ते जमलंही, त्यामुळे वेगळ्या कथांमधून आधुनिक बॉण्ड समोर आला.

काहीही असो, पण एक मात्र खरं की नवीन बॉण्डची घोषणा झाली की अर्ध जग आनंदी होतं आणि अर्ध जग नाराज होतं. परवाच्या १६ नोव्हेंबर २०२६ ला तेच झालं. Amazon MGM ने एक फोटो टाकला – टक्सिडोमध्ये उभा असलेला एक माणूस. खाली फक्त तीन शब्द — Robert Pattinson is James Bond.बस्स. सोशल मीडियावर धमाका झाला. कारण बॉण्ड म्हणजे फक्त एक भूमिका नाही, तर प्रत्येक पिढीची स्वप्नं आहेत, होती.

आज शॉन कॉनरीचं नाव घेतलं की लोकं म्हणतात, ”तोच खरा बॉण्ड.” पण, १९६२ मध्ये जेव्हा कॉनरीची निवड झाली तेव्हा लोकांनी त्यालाही नाकं मुरडली होती. इयान फ्लेमिंगला तर कॉनरी अजिबात आवडला नव्हता. फ्लेमिंगच्या मनातला बॉण्ड म्हणजे उंच, सडपातळ, इंग्लिश उच्चार असलेला गृहस्थ. आणि कॉनरी? स्कॉटलंडचा. आधी दूधवाला, नंतर बॉडीबिल्डर, नंतर ट्रक ड्रायव्हर. बोलण्यात स्कॉटिश झाक. वैतागलेले फ्लेमिंग म्हणाले, ”हा माणूस माझा बॉण्ड होऊच शकत नाही.” पण, डॉ. नो रिलीज झाला आणि सगळं बदललं. कॉनरीने ज्या रुबाबात मार्टिनी मागवली, ज्या कठोरपणे गोळी झाडली ते पाहून फ्लेमिंगनेही मान्य केलं, नव्हे त्याला मान्य करावं लागलं – ”हाच माझा बॉण्ड आहे.” नंतर फ्लेमिंगने आपल्या पुढच्या पुस्तकातच बॉण्डला अर्धा स्कॉटिश बनवून टाकलं.

एका चित्रपटातच संपलेला बॉण्ड जॉर्ज लेझनबीचं नाव फार लोकांना माहीत नाही. कारण त्याने फक्त एकच बॉण्ड चित्रपट केला – On Her Majestyls Secret Service. लेझनबी आधी मॉडेल होता. त्याने कधीच अभिनय केला नव्हता. ऑडिशनला कॉनरीसारखा दिसायला हवं म्हणून त्याने स्वत:च सूट विकत घेतला, कॉनरीसारखीच हेअरस्टाईल केली आणि निर्मात्यांसमोर गेला. त्याची निवड झाली, पण चित्रपटानंतर तो निर्मात्यांशी भांडला. त्याला वाटलं, बॉण्ड आता जुना झाला आहे, त्यावेळच्या हिपहॉप हिप्पी युगात बॉण्ड चालणार नाही. त्याने करार मोडला. पुढे आयुष्यभर तो याचा पश्चाताप करत राहिला. पण गंमत म्हणजे, हाच चित्रपट आज बॉण्ड चाहत्यांमध्ये सर्वांत आवडता मानला जातो. कारण त्यात बॉण्ड पहिल्यांदाच प्रेमात पडतो, लग्नही करतो आणि त्याची बायको त्याच्या डोळ्यासमोर मरते. हा बॉण्ड रडतो. हा बाँड माणूस होता आणि आता ६० वर्षांनी, लेझनबीनेच पॅटिन्सनला व्हिडीओ पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.

रॉजर मूरने सर्वाधिक सात चित्रपटांमध्ये बॉण्ड साकारला. त्याचा बॉण्ड माणसातला होता, मिश्कील होता. पण, ८० च्या दशकात हा माणसाळलेला बॉण्ड पाहून प्रेक्षक कंटाळले. त्यांना वाटलं, बॉण्ड खूपच आपलातुपला झाला आहे. काय मजा नाय राहिली आता यात…
मग निर्मात्यांनी बाँडला पुन्हा त्याच्या साच्यात ढकलला. टिमोथी डाल्टनने रंगमंचीय अभिनयाची जोड दिली. त्यासाठी त्याने फ्लेमिंगची पुस्तकं पुन्हा वाचली. त्याचा बॉण्ड रागीट होता, हिंसक होता, स्त्रियांशी फारसा हसत नव्हता. प्रेक्षकांना तोही तितकासा भावला नाही. फक्त दोन चित्रपट त्याच्या वाट्याला आले. पण, आज ३५ वर्षांनंतर बॉण्डचे चाहते म्हणतात, त्याचा बॉण्डच खरा होता. आताच्या डॅनियल क्रेगसारखा होता. पण, डाल्टन आणि क्रेग यांच्यात २० वर्षांचा फरक होता. २० वर्षांपूर्वीचा त्याचा बॉण्ड स्वीकारला गेला नव्हता आणि आता क्रेगला डोक्यावर घेतलं गेलं…

१९९५ मध्ये पियर्स ब्रॉसनन आला. तो दिसायला इतका परफेक्ट होता की, चाहते म्हणालेसुद्धा हाच खरा बॉण्ड. गोल्डनआय तर सुपरहिट झाला. एक गंमत सांगतो. ब्रॉसननला १९८६ मध्येच बॉण्डचा चित्रपट मिळाला असता. तसा करारही झाला होता. पण, त्यावेळी तो रेमिंग्टन स्टील या टीव्ही मालिकेत होता. मालिकेच्या निर्मात्यांनी त्याला सोडलं नाही, म्हणून बॉण्ड डाल्टनकडे गेला. ब्रॉसननला आणखी नऊ वर्ष वाट पाहावी लागली. ऐसा भी होता है…

२००५ मध्ये डॅनियल क्रेगची निवड झाली तेव्हा इंग्लंडमध्ये तर जणू काही आंदोलनच उभं राहिलं होतं. असला ब्लाँड बॉण्ड नको”, ”याला उंची पण नाही”, ”हा बॉण्डपेक्षा गुंड अधिक वाटतो, एक ना अनेक शेरे, चर्चा, अगदी बातम्याही प्रसिद्ध झाल्या. एका वेबसाईटने तर ”क्रेगला हटवा” मोहीमच सुरू केली होती त्यावेळी. क्रेग शहाणा होता. तो शांत राहिला. त्याने फक्त कसिनो रोयाल केला. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याचा समुद्राच्या लाटांतून बाहेर येण्याचा सीन आहे. उघडाबंब तोकड्या चड्डीत तो कॅमेऱ्यासमोर चालत येतो. बस्स, तो सीन पाहून सगळ्या टीकाकारांच्या तोंडाला जणू टाळं लागलं. कारण क्रेग बॉण्डसारखा दिसत नव्हता, तर तो थेट बॉण्डच वाटत होता. क्रेगने बॉण्डला आणखी वेगळ्या चौकटीत बसवलं, घडवलं. त्याचा बॉण्ड मार खातो, रडतो, प्रेमात पडतो आणि शेवटी नो टाईम टू डायमध्ये मरतो, निरोप घेतो. त्या शेवटच्या सीनने जगातल्या तमाम बॉण्ड चाहत्यांची तगमग केली, त्यांना घायाळ केलंय. क्रेगने दाखवून दिलं, त्याने बॉण्डची व्यक्तिरेखाच बदलली. बाँड म्हणजे सूटबूट, मार्टीनी आणि स्टाईलभाई नाहीय तर वेदनेने कळवळणारा, प्रेमविव्हल असा तुमच्या आमच्यासारखाच माणूस आहे, हे त्याने पडद्यावरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं.

पॅटिन्सनसमोर किती अवघड कामगिरी आहे, कुठलं शिवधनुष्य त्याला उचलायचंय हे आता तुमच्या लक्षात येईल. त्याच्यावर ट्वायलाईट, बॅटमॅनचा शिक्का आहे. त्याने हा शिक्का पुसून काढण्यासाठी मुद्दाम वेगळ्या वाटेवरचे चित्रपटही केलेत. गुड टाईममध्ये तो चोर आहे, द लाईटहाऊस चित्रपटात तो हळूहळू वेडसर होत चाललेला माणूस आहे, टेनेटमध्ये तो गूढ साथीदार आहे आणि द बॅटमॅनमध्ये तो विदीर्ण झालेला, एकाकी ब्रूस वेन आहे. तो व्यक्तिरेखेत शिरतो असं म्हणतात आणि ते त्याला आता सिद्ध करायचे आहे.

त्यातच नव्या बॉण्डपटाची सूत्रं दिग्दर्शक म्हणून डेनिस व्हिलन्यूव्हने हाती घेतली आहेत. डून चित्रपटमालिका त्याचीच. डूनमुळे मला तरी एक वेगळा बॉण्डपट २०२७ मध्ये पाहायला मिळेल अशी आशा आहे. प्रत्येक चाहत्याला त्याचा बॉण्ड हवा असतो, त्याच्या कल्पनेतला, त्याने पडद्यावर समोर दिसणाऱ्या बॉण्डच्या जागी स्वतला कल्पून साकारलेला. पडद्यावरच्या बॉण्डची आणि प्रेक्षकांची अशी केमिस्ट्री जुळली की ३६ गुण जुळतात. पॅटिन्सनला हे सारे घडवून आणायचे आहे. तो ते कसे करतो हे बॉण्ड २६ मध्येच कळेल.
एक मात्र नक्की, बॉण्डवरची चर्चा कधीच संपत नाही, कारण प्रत्येक पिढीला त्यांना जसं व्हावंसं वाटतं तसा बॉण्ड हवा असतो.

शैलेंद्र शिर्के

Read About : Fake Gold Hallmark Scam : चकाकते, ते सारे सोने नव्हे!
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.