Ad Advertisement Ad Advertisement

Drought in Maharashtra – राज्यात ‘पूल तिथे बंधारा’ बंधनकारक; दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत निर्णय

रस्ते कामांसाठी तलावांतील गाळाबाबत नागपूर हिवाळी अधिवेशनात करार

मुंबई : Drought in Maharashtra – राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यापुढे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलासोबत ‘पूल वजा बंधारा’ बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सोलापूर आणि धाराशिवसह गरज भासेल तिथे तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक झाली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक पुलाखाली पाणी अडविणार

पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शासनाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नदी आणि नाल्यांवर बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाला बंधारा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडवले जाईल, असे स्पष्ट आदेश मंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरही पूल वजा बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोठी धरणे आणि तलावांचे खोलीकरण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि बिहार सरकारच्या धर्तीवर, राज्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारी माती तसेच मुरूम जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या तलावांमधून उपसण्यात येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे राज्यातील मोठी धरणे आणि तलावांचे खोलीकरण होऊन गाळ उपसण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

चारा छावण्या आणि गोशाळांसाठी गायरान जमीन

राज्यातील काही भागांत निर्माण झालेली चारा टंचाई लक्षात घेता, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्यास तत्काळ परवानगी देण्यात आली आहे. चारा पुरवठ्यासाठी 2019 मधील जुनेच दर लागू राहतील. याशिवाय, गोशाळा चालविण्यासाठी पुढे येणाऱ्या संस्थांना गायरान जमिनी 2 ते 3 वर्षांच्या भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्याचा आणि ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार गायरान जमिनीवर 2 ते 3 एकरांचे छोटे तलाव बांधण्याचा सकारात्मक विचार राज्य सरकार करत असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

इतर महत्त्वाचे निर्णय
  • गाळमुक्त धरण योजनेला मुदतवाढ : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मालगुजारी तलावांतील गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याच्या योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी 32 रुपये आणि वाहतुकीसाठी 37 रुपये प्रति घनमीटर (कमाल अनुदान 37,500 रुपये) दर निश्चित करण्यात आले आहेत.
  • वंचित शेतकऱ्यांना मदत व फार्मर आयडी : वनपट्टे धारक आणि रेकॉर्ड नसलेल्या परंतु प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या (विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील) शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अंतिम अनुदान आणि पुढील एनडीआरएफ/एसडीआरएफ मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, प्रलंबित ‘फार्मर आयडी’ काढण्यासाठी महसूल व कृषी विभागाने एसओपी जारी केली आहे.
  • रोहयो मजुरी आणि पाणीपुरवठा : मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेची मजुरी 317 रुपयांवरून 375 रुपये करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच, जलजीवन मिशनच्या अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी देऊन टँकरमुक्तीसाठी पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read About : Cambridge Word of the Year 2026 : ‘Human’ ठरला वर्षातील शब्द; AI च्या वाढत्या प्रभावाची चिंता

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.