काढणीचे श्रम वाचणार : डॉ. संजय पाटील
छत्रपती संभाजीनगर : Banana Harvesting Robot Patent Approved केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टात आणि श्रमात बचत करणारा नावीन्यपूर्ण रोबोट विकसित केल्याबद्दल हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, बदनापूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे माजी पदव्युत्तर (उद्यान विद्या विभाग) विद्यार्थी लखेसिंग गिरासे आणि प्रा. पराग बागुल यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडून नुकतेच पेटंट मंजूर झाले आहे. या रोबोटच्या पेटंटचे प्रमाणपत्र नुकतेच संबंधित संशोधकांना प्राप्त झाले असून, त्यांच्या या उल्लेखनीय संशोधनाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
मनुष्यबळ, वेळेची बचत
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. पाटील यांनी सांगितले, केळीच्या बागेत तयार झालेला पक्व केळीघड झाडावरून तोडून, तो सुरक्षितपणे ट्रॅक्टरमध्ये ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम हा रोबोट करू शकतो. केळीघड तोडणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ आणि शारीरिक श्रम कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कृषी क्षेत्राशी सांगड घालत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
पेटंट अभिनंदनीय बाब
लखेसिंग गिरासे, डॉ. संजय पाटील आणि प्रा. पराग बागुल यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी आणि संचालक संशोधन डॉ. भगवान असेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संशोधनातून कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारची पेटंट नोंदणी होणे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
Read About: Marathwada Water Storage – 931 प्रकल्पांत 37.58 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.