ऊस मिळविण्यासाठी कसरत, हंगाम लवकरच गुंडाळणार
छत्रपती संभाजीनगर: Marathwada Sugar Factories Sugarcane Crushing Season Shortage यंदाच्या ऊस गाळप हंगामाम विभागातील २९ पैकी २३ साखर कारखाने सहभागी झाले आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची वाढ खुंटल्याने कारखान्यांसमोर पुरेसा ऊस उपलब्ध करून घेण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम तुलनेने लवकर आटोपण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना बंद असल्याने तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गाळपासाठी मर्यादित पर्याय आहेत.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ६ जिल्ह्यांत दरवर्षी सुमारे १ लाख ७१ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होते. त्यापैकी १ लाख ५९ हजार ४०२ हेक्टरवरील ऊस कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होतो. उर्वरित क्षेत्रावरील ऊ स चाऱ्यासाठी विकला जातो. मागील गळीत हंगामात विभागातील कारखान्यांनी १ कोटी २२ लाख १३ हजार ९०८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यंदा मात्र पाण्याअभावी उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नसल्याने गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
बीडमधील सर्वाधिक कारखाने
जिल्हानिहाय स्थिती पाहता, बीड जिल्ह्यातील १० पैकी ९, जालना जिल्ह्यातील ५ पैकी ४ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० पैकी ८ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रत्येकी एक कारखाना सुरू आहे. नंदुरबारमध्ये दोनपैकी एक कारखाना बंद आहे, तर जळगावमधील एकमेव कारखानाही बंद आहे. त्यामुळे विभागातील एकूण २९ पैकी २३ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे.
ऊस उत्पादनातही आघाडी
ऊस लागवडीत बीड जिल्हा ६३ हजार ५१० हेक्टर क्षेत्रासह उस उत्पादनात आघाडीवर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४० हजार ५०० हेक्टर, जालना जिल्ह्यात ३८ हजार ४७३ हेक्टर, नंदुरबारमध्ये १३ हजार ६२१ हेक्टर, तर जळगावमध्ये ३ हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची उपलब्धता आणि कारखान्यांचे गाळप नियोजन यावर परिणाम होण्याची शक्यता असून, कारखान्यांना हंगाम पूर्णक्षमतेने चालविण्यासाठी ऊस मिळविताना कसरत करावी लागणार आहे.
Read About: Anirudh Ravichander Wedding – ग्रीसमधील विवाहानंतर अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारनचे चेन्नईत जल्लोषात स्वागत
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.