Ad Advertisement Ad Advertisement

Bengaluru Smoking Ban – बंगळुरूत हॉटेल, पब, बारमध्ये धूम्रपानबंदीचा प्रस्ताव

मुख्यमंत्री घेणार अंतीम निर्णय : पूर्ण बंदीची तज्ज्ञांच्या समितीची शिफारस

बंगळुरू : Bengaluru Smoking Ban -बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाबाबत मोठा निर्णय येऊ शकतो. कर्नाटक सरकार शहरात ‘धूम्रपानमुक्त क्षेत्र’ लागू करण्याच्या तयारीत आहे. हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये सिगारेट ओढण्यावर पूर्ण बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. परदेशातील नियमांच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावावर आरोग्य विभाग पुढे जात आहे. पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.

तज्ज्ञांच्या समितीने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान रोखण्यासाठी आपला अहवाल आरोग्य विभाग आणि सरकारकडे सोपवला आहे. आरोग्यमंत्री यू. टी. खादर यांनीही प्रस्ताव मान्य असल्याचे सांगितले. ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतर सरकार पुढील निर्णय घेईल. प्रस्ताव मंजूर झाला तर बंगळुरूमध्ये सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्याचे नियम आधीपेक्षा कडक होतील.

प्रस्तावानुसार हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये धूम्रपानाला परवानगी देऊ नये. सध्या अनेक ठिकाणी धूम्रपानासाठी वेगळी सोय असते, पण त्यानेही धूर पूर्णपणे रोखणे कठीण असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून पूर्ण बंदीची गरज आहे. आयटी आणि बीटी कंपन्यांमध्येही धूम्रपानासाठी वेगळी जागा आहे. तिथेही ठरलेल्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी समितीची सूचना आहे. धूम्रपान करणाऱ्यांमुळे आसपासच्या इतरांना त्रास होऊ नये, हा यामागचा हेतू आहे.

पॅसिव्ह स्मोकिंगचा धोका

सिगारेट ओढण्याचा फक्त ओढणाऱ्यालाच नव्हे, तर आसपासच्या लोकांनाही धुराचा त्रास होतो, याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. स्वत: सिगारेट न ओढणारी व्यक्ती आसपासचा धूर श्वासावाटे घेते, तेव्हा तिच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशा धुराच्या संपर्कामुळे कर्करोग आणि श्वसनाच्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान रोखण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. अशा बंदीमुळे सामान्य लोकांना विषारी धुरापासून वाचवता येईल, असे आरोग्य विभागाला वाटते.

कर्करोग तज्ज्ञांचा लंडन मॉडेलचा सल्ला

धूम्रपानमुक्त क्षेत्राच्या मागणीमागे कर्करोग तज्ज्ञांचीही मोठी भूमिका आहे. लंडनच्या धर्तीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला परवानगी देऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉ. विशाल राव यांनी सांगितले की, यासंबंधीचा अहवाल आधीच सरकारला देण्यात आला आहे. वेगवेगळे स्मोकिंग झोन करण्यापेक्षा पूर्ण बंदी जास्त प्रभावी ठरेल, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे ज्यांना धूम्रपानाची सवय नाही, पण इतरांमुळे धुराचा सामना करावा लागतो, त्यांनाही दिलासा मिळेल.

Read About : Natural Childbirth Awareness Rally – नैसर्गिक प्रसूतीच्या महत्त्वाबाबत जनजागृतीसाठी निघाली पदयात्रा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.