जिल्हाधिकारी विनय गौडा यांची नोंदणी कार्यालयाला अचानक भेट; कार्यालय एजंटमुक्त ठेवण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : Document Registration Token System – दस्त नोंदणी कार्यालयात एजंटांची वाढती गर्दी आणि टोकण पद्धतीला बगल देऊन दस्त नोंदणी होत असल्याच्या तक्रारींची जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी (दि. २३) त्यांनी अचानक दस्त नोंदणी कार्यालय क्रमाक १ ला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी टोकण पद्धतीनुसारच दस्त नोंदणी करण्याचे निर्देश देत, या पद्धतीचा भंग करून नोंदणी केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कार्यालय आणि परिसर एजंटमुक्त ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नोंदणी विभागाचे उपमहानिरीक्षक, सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १, विवाह नोंदणी कार्यालय अशी कार्यालये आहेत. या ठिकाणी यापूर्वी पाच दस्त नोंदणी कार्यालयांसह विवाह नोंदणीचे कामकाज चालत होते. मात्र, दस्त नोंदणीसाठी होणारी वाढती गर्दी, एजंटांकडून होणारा मनस्ताप आणि अपुऱ्या जागेमुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे यातील दोन कार्यालये बीड बायपास परिसरात स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर नुकतीच आणखी दोन कार्यालये गारखेडा आणि चिकलठाणा परिसरात सुरू करण्यात आली. परिणामी मुख्य इमारतीतील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली, तरी एजंटांचा वावर अद्याप कायम असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या.
दरम्यान, या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गौडा यांनी सोमवारी अचानक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी सह जिल्हा निबंधक रुपेश सिंगारे यांचीही उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दस्त नोंदणीच्या कामकाजाची पाहणी करून प्रभारी सह दुय्यम निबंधक निर्मला बहुरे यांच्याकडून नोंदणी प्रक्रियेची माहिती घेतली. कार्यालयात टोकण पद्धतीचा अवलंब केला जातो का, प्रत्येक नागरिकाच्या दस्ताची नोंदणी नियमानुसार होते का, याचीही त्यांनी चौकशी केली.
दस्त नोंदणीसाठी टोकण पद्धती निश्चित करण्यात आली असताना त्यानुसारच कामकाज होणे आवश्यक आहे. या पद्धतीला बगल देऊन दस्त नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच खरेदी-विक्री व्यवहारातील दस्त घेणारे आणि देणारे आणि त्यांचे वकील यांच्याशिवाय अन्य कोणालाही कार्यालयात प्रवेश देऊ नये. एजंटांचा कार्यालयातील वावर पूर्णपणे रोखावा आणि कार्यालय परिसरातही एकही एजंट आढळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अचानक भेटीने नोंदणी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बेकायदेशीररित्या कोम करणारे खाजगी कर्मचारी, एजन्ट यांचे चांगलेच धाबे दणाणले. खाजगी कर्मचारी आणि एजन्टांनी तात्काळ नोंदणी कार्यालयातून काढता पाय घेतला.
कामकाजाबाबत माहिती घेतली
दस्त नोंदणी कार्यालयात कोणत्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, टोकण पद्धतीनुसार प्रत्येकाचे दस्त नोंदविले जातात का, यासह अन्य बाबींची माहिती घेतली आहे. कार्यालयात अनावश्यक गर्दी होणार नाही आणि एजंटांचा वावर राहणार नाही, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
विनय गौडा जी.सी.
जिल्हाधिकारी
Read About : Indian Citizenship Renunciation – पाच वर्षांत 9 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व; देश सोडण्यामागे पैसा, संधी की व्यवस्थेतील त्रुटी?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.