Ad Advertisement Ad Advertisement

BMI and Healthy Aging : वयाच्या 65 वर्षांनंतर थोडे जास्त वजन फायदेशीर ठरू शकते? संशोधनातून महत्त्वाची माहिती

६,९०५ ज्येष्ठ नागरिकांच्या १४ वर्षांच्या आरोग्यविषयक नोंदींच्या अभ्यासातून वजन आणि दीर्घायुष्याबाबत नवे निरीक्षण; बीएमआयसोबत शरीरातील चरबीचे प्रमाण आणि तिचे स्थान तपासणे महत्त्वाचे.

नवी दिल्ली : BMI and Healthy Aging वजन कमी ठेवणे म्हणजेच उत्तम आरोग्य, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्या व्यक्तींच्या बाबतीत हे समीकरण काहीसे वेगळे असू शकते. नव्या संशोधनानुसार, ज्येष्ठ व्यक्तींमध्ये तुलनेने जास्त बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) असणे काही परिस्थितींमध्ये दीर्घायुष्याशी संबंधित असू शकते. त्यामुळे वयानुसार वजनाचे मूल्यमापन करताना केवळ काट्यावरील आकड्यावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही.

अमेरिकेतील ६,९०५ ज्येष्ठ नागरिकांच्या तब्बल १४ वर्षांच्या आरोग्यविषयक नोंदींचे संशोधकांनी विश्लेषण केले. ऱ्होड आयलंड विद्यापीठातील संशोधक ब्रायन ब्लिसमर यांनी या निष्कर्षांबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, शरीरातील चरबीचे प्रमाण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती कोणत्या भागात साठते हेही महत्त्वाचे आहे.

पोटावरील चरबी अधिक धोकादायक

पोटाभोवती साठणारी चरबी शरीरातील दाह, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढवू शकते. याउलट, शरीराच्या इतर भागांतील चरबीचा जैविक परिणाम वेगळा असू शकतो. तरुणांमध्येही सामान्य बीएमआय असूनही पोटावर चरबी असणाऱ्यांमध्ये अकाली मृत्यूचा धोका दिसल्याचे संशोधनात नमूद आहे.

‘बीएमआय’चा आकडा पुरेसा नाही

‘बीएमआय’ मोजताना स्नायू आणि चरबी यांतील फरक लक्षात घेतला जात नाही. त्यामुळे स्नायूंचे प्रमाण अधिक असलेल्या व्यक्तींचाही ‘बीएमआय’ जास्त दिसू शकतो. संशोधकांनी स्पष्ट केले की, हा अभ्यास अतिरिक्त चरबी आरोग्यासाठी संरक्षक असल्याचा पुरावा नाही. वय, शरीररचना आणि चरबीचे स्थान लक्षात घेऊन आरोग्याचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा.

Read About : Breast Milk Nutrition – आईच्या दुधातही देशोदेशी फरक

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.