Ad Advertisement Ad Advertisement

Call Bombing Cyber Attack मोबाइलवर ‘कॉल बॉम्बिंग’; दर २ मिनिटाला स्पॅम कॉल

‘लेगॲन’ ॲप चालवणारी कंपनी, ॲप वापरणाऱ्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल

Call Bombing Cyber Attack छत्रपती संभाजीनगर : पैशांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी थेट कॉल बॉम्बिंग करून एका नागरिकाचा भयंकर मानसिक छळ केला. गुगल प्ले स्टोअरवरील ‘लेगॲन’ नावाच्या ॲपचा वापर करून सलग अनेक दिवस, दर दोन मिनिटाला स्वयंचलित स्पॅम कॉल्स केले गेले. या हायटेक आणि बेकायदेशीर सायबर हल्ल्याची गंभीर दखल घेत, सायबर पोलिसांनी थेट हे ॲप चालवणारी कंपनी आणि ते वापरणाऱ्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

लेगॲन ॲपची कंपनी ग्रेट माइंड फिनटेक प्रा. लि.चा मालक आणि संचालक आणि कॉल बॉम्बिंग करणारा कैलास सर्जेराव पवार (वय ४२, रा. श्रीकृष्णनगर, सुंदरवाडी) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. अर्जुन उत्तम पवार (रा. बीड बायपास) यांनी सायबर पोलिसांकडे एक अर्ज केला होता. त्यानुसार, आरोपी कैलास पवार आणि त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. थकबाकी वसुलीसाठी आरोपी कैलासने लेगॲन ॲपचे सबस्क्रप्शिन घेतले. त्या ॲपच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२६ पासून अर्जुन यांना दर दोन मिनिटाला एका पाठोपाठ एक स्पॅम कॉल्स येऊ लागले. कॉलर आयडी लपवून आणि कोणत्याही टेलिकॉम कंपनीशी संबंधित नसलेल्या नंबरवरून हे कॉल्स येत होते.

एका सामान्य नागरिकाला त्याचा मोबाईल फोन वापरणेही अशक्य व्हावे, इतके कॉल्स करून हा डिनायल ऑफ सर्व्हिस प्रकारचा सायबर हल्ला करण्यात आला, असा आरोप केला होता. चौकशीनंतर अंमलदार अमोल सोनटक्के यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर करीत आहेत.

बनावट पावत्या अन् बँक खाते गोठवले

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता मोठे रॅकेट उघडकीस आले. लेगॲन ॲप चालवणाऱ्या ग्रेटमाईंड फिनटेक प्रा. लि. कंपनीने पैसे स्वत:च्या खात्यात स्वीकारले, मात्र सबस्क्रप्शिनची पावती ग्रेटमाइंड लॉसुट व्हेंचर्स प्रा. लि. या दुसऱ्याच कंपनीच्या नावाने जनरेट करून बनावटगिरी केली. या ॲपचे पैसे रेझरपे आणि युपीआयद्वारे कोटक महिंद्रा बँकेच्या एका खात्यात जमा होत असल्याचे उघड झाल्यावर, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हे बँक खाते गोठवले आहे.

परदेशातून चालवतात बेकायदेशीर नेटवर्क

दूरसंचार विभागाच्या (डीओटी) नियमांचे उल्लंघन करून, परदेशातून सिमबॉक्स किंवा एसआयपीच्या माध्यमातून हे बेकायदेशीर नेटवर्क चालवले जात असल्याचा प्राथमिक संशय आहे. पोलिसांनी ॲपच्या कंपनी मालक आणि संचालकांना नोटीसा बजावल्या आहेत. चौकशीनंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल असे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.

कॉल बॉम्बिंग म्हणजे सायबर हल्ला

कॉल बॉम्बिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला किंवा मानसिक छळ आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर संगणकीय प्रणाली, ॲप्स किंवा बोट्सचा वापर करून अत्यंत कमी वेळेत शेकडो किंवा हजारो स्वयंचलित कॉल्स केले जातात. तसेच, डिनायल ऑफ सर्व्हिस म्हणजे, सलग कॉल्स येत राहिल्यामुळे पीडित व्यक्तीचा फोन सतत व्यस्त राहतो, फोन हँग होतो किंवा बॅटरी लवकर संपते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीला कोणतेही दुसरे कॉल्स येत नाहीत. एकप्रकारे त्या व्यक्तीचा फोन निरुपयोगी करून टाकला जातो. अनेक वित्तीय संस्था वसुलीसाठी अशा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करतात.
– मयूर दिवटे, सायबर तज्ज्ञ

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.