Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘तुम पोलीस हो तो क्या हुआ?’ म्हणत बीट मार्शलवर हल्ला

मिल कॉर्नर येथील साई हॉस्पिटलसमोर ट्रकचालक आणि दुचाकीस्वारांचा वाद सोडवताना पोलिसांशी झटापट; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime : रस्त्यावर ट्रकचालक आणि दोन दुचाकीस्वारांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ऑन ड्यूटी बीट मार्शल पोलिसांवर दोघांनी हल्ला केल्याची घटना घडली. ‘तुम पोलीस हो तो क्या हुआ, हम किसीसे डरते नही’ असे म्हणत पोलिसांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट केल्याचा आरोप आहे. रविवारी (दि. २७) पहाटे १.४५ वाजता मिल कॉर्नर येथील साई हॉस्पिटलसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सईद जावेद पठाण (वय २३) आणि फैजल इब्राहिम पठाण (वय ३३, दोघे रा. बेरीबाग, हर्सूल) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलीस अंमलदार नितीश काकड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकड आणि अंमलदार शिंदे हे २६ सप्टेंबरच्या रात्री कर्तव्यावर होते. रविवारी पहाटे नियंत्रण कक्षातून मिल कॉर्नर येथील एमएसईबी कार्यालयाजवळ काही लोकांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काकड आणि शिंदे साई हॉस्पिटलसमोर घटनास्थळी पोहोचले.

त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी ट्रकच्या समोर दोन दुचाकी आडव्या लावण्यात आल्या होत्या. दुचाकीस्वार आणि ट्रकचालक यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले; मात्र संबंधितांनी नकार देत पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनी दमदाटी करत त्यांच्याशी झटापट केल्याचा आरोप आहे. सईद पठाण याने नितीश काकड यांची कॉलर पकडून त्यांच्या उजव्या दंडाला नखांनी ओरबाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर फैजल पठाण याने अंमलदार शिंदे यांची कॉलर पकडून त्यांच्याशी झटापट आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

गोंधळात ट्रकचालक पसार

पोलिस आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू असताना घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा फायदा घेत ट्रकचालक ट्रकसह तेथून निघून गेल्याची माहिती आहे.

मदतीसाठी डायल ११२ ला पाचारण

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी डायल ११२ च्या पथकाला मदतीसाठी बोलावले. त्यानंतर सईद आणि फैजल यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

पोलिसांशी झालेल्या झटापटीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

Read About : Jaipur Temple Dispute : जयपूर मंदिरातील आवाजावरून वाद; पुजाऱ्याशी गैरवर्तन, दोघांना अटक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.