४१ एकर जमीन भूमाफियांनी विकली : ८१० पैकी ९० टक्के भूखंडांची बॉंडवर विक्री
Class 2 Land Plotting छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत प्लॉटिंगवरील कारवाईचा धडाका महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सुरुच ठेवलेला आहे. आंबेडकरनगर ते पिसादेवी रोडवरील सनी सेंटरमागील वर्ग २ च्या ४१ एकर जमिनीवर प्लॉट पाडून विक्री केल्याचे कारवाईतून समोर आले. बुधवारी (दि.३०) पथकाने या जमिनीवर जेसीबी फिरवित प्लॉटची मार्किंग उद्ध्वस्त केली.
जाधववाडी बाजार समितीसमोरील बाजूस सनी सेंटरच्या मागील गट क्रमांक १२४ आणि १२५ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध प्लॉटिंग करून प्लॉट विक्री केली जात असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने स्थळपाहणी केली. यावेळी काही नागरिक व प्लॉट खरेदीदारही आले. याठिकाणी तब्बल ४१ एकरावर चुना आणि दगडांचा वापर करून मार्किंग करण्यात आली होती.
सुमारे ८१० प्लॉट या जागेवर असून, यातील सुमारे ८०-९० टक्के पलॉट विक्री झालेले आहेत. या गटाचा सातबारा अधिकाऱ्यांनी तपासला असता, ही जागा ‘श्रीराम मंदिर संस्थान, बालाजी मठ’ यांच्या नावे असून, जमीन ‘वर्ग-२’ श्रेणीतील असल्याचे स्पष्ट झाले. असे असतानाही, काही लोकांनी या जागेवर प्लॉट पाडून ते विक्री करण्याचा सपाटा लावला होता. मनपा आयुक्त यांच्या आदेशाने ही कारवाई झाली.
२४५८ चौ.फुटाचा प्लॉट १ कोटी १६ लाखांना विक्री
या जागेवरील प्लॉट बाँडवर विक्री करण्यात आले आहेत. श्री रामानंद बिल्डर्स ॲण्ड लॅण्ड डेव्हलपर्स यांच्यातर्फे मुकुंद कुलकर्णी यांनी प्लॉट खरेदी करणाऱ्यांना बाँडद्वारे नोटरी करून विक्री केले आहेत. या जागेतील २४५८ चौरस फुटाचा प्लॉट नंबर ८ चा व्यवहार २४ एप्रिल २०२५ रोजी झालेला असून, प्रभाकर मोहिते यांनी १ कोटी १६ लाख १ हजार ७६० रुपयांना खरेदी केलेला आहे.
आंबेडकरनगर रोडवरील सनी सेंटरच्या मागील गट नंबर १२४ व १२५ मधील ४१ एकर जमीन आहे. हा गट वर्ग २ मध्ये असून, श्रीराम मंदिर संस्थान बालाजी मठ या नावाने सातबारा आहे. परंतू वर्ग २ ची जमीन असल्याने या जमीनीवरील लेआऊटला मंजूरी नाही असे संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, मनपा. यांनी सांगितले.
Read About : 70 TMC river linking project छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ७० टीएमसीचा नदीजोड प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.