वणव्यांचा धूर आणि उष्णतेच्या लाटांमुळे प्रदूषणाचा धोका वाढला, PM 2.5 मुळे श्वसन व हृदयविकाराचा धोका
जिनेव्हा : Climate Change वाढणारे भीषण वणवे आणि उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या आणि मानवी आरोग्याचे रक्षण करण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसत आहे. हवामान बदलामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर शुद्ध हवेची उद्दिष्टे गाठणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामानशास्त्र संघटनेने आपल्या वार्षिक अहवालात दिला आहे. कॅनडा, रशिया आणि युरोपमधील स्पेन, फ्रान्स, ग्रीस या देशांना यंदा भीषण उष्णतेचा आणि आगीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
हवामान बदल आणि प्रदूषण यांचा परस्पर संबंध डब्ल्यूएमओ ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, वायू प्रदूषण आणि हवामान बदल हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी समन्वित धोरणांद्वारे एकत्र लढा देणे गरजेचे आहे. अनेक विकसित देशांनी उद्योग आणि वाहतुकीतून होणारे उत्सर्जन नियमांद्वारे कमी केले असले, तरी वणव्यांमुळे निर्माण होणारे प्रदूषण हा आता हवेची गुणवत्ता खराब करणारा सर्वात मोठा आणि घातक स्त्रोत बनत चालला आहे. एखादे शहर किंवा प्रदेश कितीही स्वच्छ असला, तरी दूरवर लागलेल्या वणव्यांचा धूर आणि प्रदूषण तिथली हवा देखील विषारी करू शकते, असे डब्लूएमओच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
आरोग्यावर घातक परिणाम आणि वाढते मृत्यू
या प्रदूषणात सूक्ष्म कण म्हणजेच पीएम २.५ चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते, ज्यामुळे मानवामध्ये श्वसनाचे गंभीर आजार आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. वणव्यांमधून निघणाऱ्या धुरात अनेक प्रकारची विषारी रसायने असतात, ज्यामुळे फुफ्फुसाचे आजार बळावतात. एका अभ्यासानुसार, १९९० च्या दशकापासून जगभरात वणव्यांच्या धुराच्या तीव्र घटना तब्बल तिप्पट झाल्या आहेत. या घातक धुरामुळे २०१० ते २०१८ दरम्यान जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे १ लाख अतिरिक्त मृत्यू झाले असण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
Also Read : Orange Jasmine Plant : मनी प्लांटपेक्षाही घरात ‘ही’ वनस्पती लावणे शुभ मानतात; जाणून घ्या फायदे आणि योग्य दिशा
E-Paper : Punyanagari E-Paper

You need an account to post comments.