अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार मानवी संसाधन विकसित करण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचे
मुंबई : CM Fadnavis – नोकरीच्या बाजारपेठेत केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून त्या पदवीसोबत उपयोजित ज्ञान आणि रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. जोपर्यंत त्याला व्यावहारिक कौशल्ये आणि उपयोजित ज्ञानाची जोड मिळत नाही, तोपर्यंत ती पदवी केवळ एक ‘कागदाचा तुकडा’ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
ठाणे जिल्ह्याच्या उल्हासनगर येथे हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्डच्या चंदीबाई हिंमतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या आणि अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित केल्यास भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळे कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचे कार्य शैक्षणिक संस्थांनी करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
कुशल मनुष्यबळ पुरविण्याची भारताला संधी
भारताकडे जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असून या लोकसंख्येला योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास भारताला जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ पुरविण्याची मोठी संधी आहे. आजच्या अर्थव्यवस्थेच्या गरजांनुसार मानवी संसाधन विकसित करण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचे आहे. या दृष्टीने सीएचएम संस्थेने सुरू केलेला उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्र म्हणजे समाजनिर्मितीची व्यवस्था
शिक्षण क्षेत्राकडे केवळ व्यवसाय किंवा पैसा कमावण्याचे साधन म्हणून न पाहता समाजनिर्मितीची व्यवस्था म्हणून पाहण्याची एचएसएनसी संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे संस्थेचे माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत. संस्थेने निर्माण केलेली ही शैक्षणिक परंपरा आणि वारसा पुढे नेण्याचे काम विश्वस्त, प्राध्यापक आणि प्राचार्य करीत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
संस्थेची शैक्षणिक वाटचाल
एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेताना, गेल्या 75 वर्षांहून अधिक काळात मुंबई महानगर प्रदेशात 14 महाविद्यालयांच्या माध्यमातून 45 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसह शिक्षण आणि रोजगार यांमधील दरी कमी करण्यासाठी संस्थेने कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर दिला आहे. भारत सरकारच्या सीडीटीआय योजनेंतर्गत तीन हजार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
Read About : Mental Health Support for Farmers – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आता मानसिक आधाराची साथ -2026
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.