महावितरणचे सब-कॉन्ट्रॅक्ट देऊन कोट्यवधींची बिले हडपली : तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
छत्रपती संभाजीनगर : Hyderabad Company Fraud in Sambhajinagar महावितरणच्या गावठाण फिडर सेपरेशन प्रकल्पाचे सब-कॉन्ट्रॅक्ट देऊन २५ कोटी १९ लाख रुपयांची कामे करून घेतली आणि त्यानंतर बिले हडपून हैदराबादच्या एका कंपनीने शहरातील उद्योजकाला तब्बल ११ कोटी ३८ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी हैदराबादच्या विश्वनाथ प्रोजेक्ट लि.च्या तीन संचालकांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २१) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचे गांभीर्य पाहून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
विश्वनाथ प्रोजेक्ट लि.चा चेअरमन तथा कार्यकारी संचालक कोमारवेल्ली शिवाकुमार ऊर्फ के. शिवकुमार (वय ६८), कार्यकारी संचालक दारापुनेनी मुरली ऊर्फ डी. मुरली (वय ६८, दोघे रा. हैदराबाद) आणि संचालक कोमारवेल्ली नंदिश्वर ऊर्फ के. नंदेश्वर (वय ४१, रा. मेडक, तेलंगणा) अशी आरोपींची नावे आहेत.
सुतगिरणी चौकातील अनुकूल पॉवर इंजिनिअर्स प्रा. लि.चे संचालक अजित अमृतराव देशपांडे (वय ५२) हे फिर्यादी आहेत. देशपांडे यांच्या परिचयाचे महेश हासोरीकर (रा. लातूर) हे पूर्वी विश्वनाथ प्रोजेक्ट लि. येथे महाव्यवस्थापक होते. त्यांनी देशपांडे यांची भेट घेऊन कंपनीला मिळालेल्या टेंडरची माहिती देत चेअरमन के. शिवकुमार व कार्यकारी संचालक डी. मुरली यांची भेट घालून दिली. त्यानंतर तिन्ही संचालकांसोबत झालेल्या चर्चेअंती जालना विभाग-२ मधील महावितरणच्या टी-२८ टेंडरचे काम करण्यासाठी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन्ही कंपन्यांत सामंजस्य करार झाला.
त्यानुसार महावितरणची बिले स्वतंत्र एस्क्रो खात्यावर येऊन ९५.६३ टक्के रक्कम देशपांडे यांना, तर ४.३७ टक्के रक्कम विश्वनाथ प्रोजेक्टला मिळणार होती. या आश्वासनावर देशपांडे यांनी सुमारे १२ कोटींची गुंतवणूक करत २ कोटी ३४ लाख २५ हजार ७५० रुपयांची बँक गॅरंटी दिली होती, असे आर्थिक गुन्हे शाखा निरीक्षक अशोक भंडारे यांनी सांगितले.
अशी केली फसवणूक
आरोपींनी करारातील एस्क्रो खाते कधीच सुरू केले नाही. उलट बिलांचे पैसे परस्पर स्वत:च्या आयसीआयसीआय आणि एसबीआय खात्यावर वळवले. देशपांडे यांनी केलेल्या २५.१९ कोटींच्या कामापैकी १६.७१ कोटी देऊन उर्वरित ८.४८ कोटी रुपये हडपले. अंबडच्या गोडाऊनमधील त्यांचे ५६ लाखांचे विद्युत साहित्य परस्पर उचलले आणि २.३४ कोटींची बँक गॅरंटीही मोकळी केली नाही. अशी एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच देशपांडे यांना स्वत:च्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट दाखवणारे बनावट पत्र तयार करून सहीसाठी दबाव आणल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
रद्द परवान्यावर कोट्यवधींची बिले
आरोपींनी मीरा रोड (ठाणे) येथील खोट्या पत्त्यावर घेतलेला विद्युत कंत्राटदार परवाना (क्र. २२१३७) ११ मार्च २०२५ रोजीच रद्द झाला होता. तरीही ही बाब लपवून जालना व चंद्रपूरच्या विद्युत निरीक्षकांशी संगनमत करत फीडर चार्जिंगची परवानगी मिळवली आणि कोट्यवधींची बिले उचलली. तसेच सब-कॉन्ट्रॅक्टसाठी महावितरणची पूर्वसंमती न घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ यांनी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक भंडारे यांनी दिली.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.