नागपूरच्या नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन व प्रार्थनेने सुरुवात
नागपूर : Devendra Fadnavis celebrates Diwali with farmers यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. सायंकाळी लोहारी सावंगा येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्र्यांचे महिलांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यानंतर सर्वांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने व प्रार्थना म्हटली.
उपस्थिताना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हे वर्ष सर्वांकरिता व विशेषत: शेतकऱ्यांसाठी अतिशय आव्हानाचे वर्ष होते. पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत पाऊस झाला, नंतर मात्र पावसाने दडी मारली आणि शेवटपर्यंत पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीची सुरुवात केलेली आहे. सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. आतापर्यंत २१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. अजूनही ही प्रक्रिया सुरू असून जवळपास ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा सरकार देणार आहे. त्याचसोबत जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा केलेली आहे.
आता लवकरच आपण दुष्काळाचे पैसेदेखील जमा करणे सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांचे विजेचे बिल माफ केले आहे. तसेच जवळपास ५८ हजार कोटी रुपयांचे पेंडिंग बिल आहे तेदेखील पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे सर्व पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तसेच अशा स्थितीत शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.चरणसिंह ठाकूर, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. डॉ. राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, सुधाकर कोहळे, सरपंच विपिन चाफले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.सीईओ विनायक महामुनी उपस्थित होते.
राष्ट्रसंतांच्या भजनांनी उभारी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमध्ये इतकी शक्ती आहे की कोणी कितीही अडचणीत असला, खचला असला तरी राष्ट्रसंतांच्या भजनांनी त्याला उभारी येते. ग्रामगीता ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे. दुष्काळाच्या काळात आपण काय केले पाहिजे हे शिकवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच होते.
जलसंधारणातून जलक्रांती
जलसंधारणाचा मंत्रदेखील आपल्याला राष्ट्रसंतांनीच दिला आहे. जलसंधारणातून आपण जलक्रांती करू शकतो. संपूर्ण सरकार आपल्या पाठीशी उभे राहणार, संकटातून उभारून पुन्हा एकदा आपण उभे राहू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महत्वाचे मुद्दे
Read About : Maharashtra farmers Diwali relief- सरकारची दिवाळी बळीराजाच्या दारात
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.