घाटीतील ८०० रुग्णांसाठी खास पुरी, छोले-बटाट्याची भाजी, पुलाव, बेसन बर्फी अन् फळांची मेजवानी
छत्रपती संभाजीनगर : Diwali Celebration Away from Home – दिवाळी म्हटली की घराघरांत आनंदाची लगबग, फराळाचा सुगंध, गोडधोड पदार्थांची रेलचेल आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचा उत्साह असतो. घरातील प्रत्येक जण दिवाळीच्या आनंदात रमलेला असतो. मात्र, याच दिवशी आजारपणामुळे रुग्णालयाच्या खाटेवर उपचार घेत असलेल्या अनेकांना आपल्या घरापासून, कुटुंबीयांपासून आणि सणाच्या आनंदापासून दूर राहावे लागते.
अशा रुग्णांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचे हास्य फुलावे, त्यांच्या ताटात सणाचा गोडवा उतरावा आणि घरापासून दूर असल्याची खंत काही क्षणांसाठी का होईना कमी व्हावी, या भावनेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) प्रशासनाने माणुसकीचा सुंदर परिचय दिला. दिवाळीनिमित्त रविवारी (दि. ८) घाटीतील सुमारे ८०० रुग्णांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या विशेष मेजवानीतून रुग्णांना केवळ पोटभर जेवणच नव्हे, तर आपुलकीचा आणि काळजीचा मायेचा घासही मिळाला.
दिवाळीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यापासूनच या विशेष उपक्रमाची सुरुवात झाली. रुग्णांना नाश्त्यासाठी खिचडी आणि अंडी देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी तर खास सणासुदीचा बेत आखण्यात आला होता. ताटात सुगंधित पुलाव, छोले-बटाट्याची भाजी, चपाती, गरमागरम पुरी, गोडधोड म्हणून बेसन बर्फी, तसेच केळी आणि मोसंबी या फळांचा समावेश होता. नेहमीच्या रुग्णालयीन जेवणापेक्षा वेगळ्या आणि रुचकर पदार्थांनी सजलेले हे ताट पाहून रुग्णांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता आला.
अधिष्ठात्यांनी स्वत: वाढला मायेचा घास!
या उपक्रमातील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी स्वत: पुढाकार घेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना जेवण वाढून दिले. केवळ प्रशासनाकडून भोजनाची व्यवस्था करून न थांबता त्यांनी प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचत त्यांच्या ताटात जेवण वाढले. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांची विचारपूसही केली.
सणाच्या दिवशी घरापासून दूर असलेल्या रुग्णांना अधिष्ठात्यांनी स्वत:च्या हाताने जेवण वाढून दिल्याने या उपक्रमाला विशेष आपुलकीची किनार लाभली. पदाचा औपचारिकपणा बाजूला ठेवून रुग्णांप्रती जिव्हाळा आणि संवेदनशीलता जपणारे हे दृश्य उपस्थितांसाठीही भावनिक ठरले.
घरापासून दूर असलेल्यांच्या ताटात दिवाळीचा गोडवा!
दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला आपल्या माणसांसोबत राहावेसे वाटते. घरातील दिवे, फराळ, मिठाई, नातेवाइकांच्या भेटीगाठी आणि आनंदाचे क्षण यांची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. मात्र, घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांना प्रकृतीच्या कारणामुळे हा सण रुग्णालयातच घालवावा लागत आहे. कुणाला आजारपणामुळे घरी जाता आले नाही, तर कुणाच्या उपचारांचा कालावधीच दिवाळीच्या दिवसांवर आला. अशा परिस्थितीत घरच्या सणाची आठवण आणि कुटुंबीयांपासून दूर राहण्याची वेदना मनात असणे स्वाभाविक आहे. हीच भावनिक बाजू लक्षात घेऊन घाटी प्रशासनाने रुग्णांसाठी विशेष भोजनाचे आयोजन केले. या उपक्रमातून रुग्णांना आपण रुग्णालयात असलो तरी आपली काळजी घेणारी माणसे आपल्या सोबत आहेत, अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला.
दिवाळीचा खरा अर्थ आनंद वाटण्यात!
दिवाळी म्हणजे केवळ घरात दिवे लावणे किंवा मिठाई खाणे नव्हे, तर इतरांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करणे. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, दु:खाच्या काळात एखाद्याला आधार देणे आणि गरजेच्या वेळी आपुलकीने साथ देणे, हाच या सणाचा खरा संदेश आहे. घाटी प्रशासनाने रुग्णांसाठी आयोजित केलेल्या या विशेष भोजनातून दिवाळीच्या याच माणुसकीपूर्ण भावनेचे दर्शन घडले.
डॉ. शिवाजी सुक्रे (अधिष्ठाता)
Read About : Humanity Police Social Workers – नात्यांनी साथ सोडली, माणुसकीने अखेरचा प्रवास सावरला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.