तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुडुचेरी आणि आसाममधील रिक्त जागांचा समावेश
Election Commission By-Election 2026 नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील पाच विधानसभा जागांवर, तसेच आसाममधील एका लोकसभा जागेवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक
मतदान: ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व जागांवर एकाच वेळी मतदान होईल.
मतमोजणी: ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
नामांकन प्रक्रिया : उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १६ सप्टेंबर असून, शेवटची तारीख १७ सप्टेंबर आहे. तसेच १९ सप्टेंबर २०२६ पर्यंत उमेदवारांना आपली नावे मागे घेता येतील.
पोटनिवडणूक होणाऱ्या जागा
तामिळनाडू : मदुरंतकम आणि धरमपुरम या दोन्ही जागांवर निवडणूक होईल. एआयडीएमकेच्या आमदार मरगथम कुमारवेल आणि पी. सत्याभामा यांनी राजीनामा देऊन टीव्हीके पक्षात प्रवेश केल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.
पश्चिम बंगाल : रेजीनगर आणि नंदीग्राम या दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. हुमायूं कबीर (रेजीनगर) आणि शुभेंदु अधिकारी (नंदीग्राम) यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर निवडणूक लढवली असल्यामुळे त्यांनी या जागा सोडल्या होत्या.
पुडुचेरी : थट्टनचावडी विधानसभा जागा, ज्या जागेवरून मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी राजीनामा दिला होता.
आसाम (लोकसभा) : नगांव संसदीय जागा, जी प्रद्युत बोरदोलोई यांनी मार्च २०२६ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झाली होती.
