LPG Booking Rules : ग्रामीण भागातील ४५ दिवसांची अट हटवली

आता शहरी आणि ग्रामीण ग्राहकांसाठी बुकिंगचे नियम समान

LPG Booking Rules : नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील ग्रामीण भागातील घरगुती एलपीजी ग्राहकांना एक अतिशय मोठा दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी गॅस सिलिंडरच्या दुसºया बुकिंगमधील किमान अंतर घटवून आता २५ दिवस करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता देशातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील ग्राहकांसाठी एलपीजी रिफिल बुकिंगचे नियम पूर्णपणे समान झाले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवार ७ सप्टेंबर रोजी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. देशातील एलपीजी पुरवठ्याची स्थिती आता मोठ्या प्रमाणावर सुधारली असून प्रलंबित बुकिंगची संख्या अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने पूर्वी लागू केलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय होती पार्श्वभूमी?
अमेरिका-इराण संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, ज्याचा थेट परिणाम भारताच्या एलपीजी उपलब्धतेवर झाला होता. देशातील एलपीजीच्या तुटवड्यामुळे सरकारने तात्पुरते निर्बंध लादले होते. त्या कालावधीत शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांच्या अंतराने सिलिंडर बुक करण्याची मुभा होती, तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी ४५ दिवस निश्चित करण्यात आला होता. यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी
राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, एलपीजी पुरवठ्यात सुधारणा झाल्यामुळे केंद्र सरकारने हा भेदभाव करणारा ४५ दिवसांचा नियम आता हटवला आहे. आता शहरी किंवा ग्रामीण भागातील कोणताही घरगुती एलपीजी ग्राहक २५ दिवसांच्या अंतराने आपले सिलिंडर बुक करू शकेल. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व तेल विपणन कंपन्यांना या संदर्भातील अधिकृत निर्देश जारी केले असून, ही नवीन सुधारित व्यवस्था तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे आदेश दिले आहेत.