२०३० पूर्वीच १.५ अंशांची मर्यादा ओलांडण्याचा धोका
पॉट्सडॅम (जर्मनी) : Global Warming Acceleration – पृथ्वीचे तापमान वाढतेय हे आपल्याला माहीत आहे. पण आता शास्त्रज्ञ सांगतात की ते फक्त वाढतच नाही, तर वाढण्याचा वेगही वाढला आहे. १८८० मध्ये तापमानाच्या नोंदी सुरू झाल्यापासून पृथ्वी कधीच इतक्या वेगाने तापली नव्हती, जितकी ती गेल्या दहा वर्षांत तापली आहे. जर्मनीतील ‘पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च’ (पीआयके) या संस्थेच्या अभ्यासाने सुमारे २०१५ पासून तापमानवाढीचा वेग वाढल्याचा पहिला ठोस सांख्यिकीय पुरावा दिला आहे.
१९७० ते २०१५ या काळात पृथ्वीचे तापमान दर दहा वर्षांनी सरासरी ०.२ अंश सेल्सिअसपेक्षा थोडे कमी वाढत होते. पण गेल्या दहा वर्षांत हा वेग दर दशकाला सुमारे ०.३५ अंशांवर पोहोचला आहे, म्हणजे जवळपास दुप्पट. आपण तापमानवाढीचा ह्यगियरह्ण बदलला आहे, असे म्हणता येईल. तापमानवाढीचा खरा वेग मोजणे सोपे नसते, कारण काही नैसर्गिक घटक तापमान तात्पुरते वर-खाली करतात. उदाहरणार्थ, ‘एल निनो’ प्रशांत महासागरातील उष्णता वातावरणात सोडून तापमान वाढवतो. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेले कण सूर्यप्रकाश परत पाठवून तापमान कमी करतात. सूर्याच्या हालचालीतील चढउतारही परिणाम करतात. हा ह्यगोंगाटह्ण बाजूला काढण्यासाठी संशोधकांनी गणिती पद्धतीने हे नैसर्गिक परिणाम आकडेवारीतून वजा केले, म्हणजे दीर्घकालीन तापमानवाढीचा मूळ कल स्पष्ट दिसू लागला, असे अभ्यासाचे सहलेखक, अमेरिकेतील सांख्यिकीतज्ज्ञ ग्रँट फॉस्टर यांनी सांगितले. वेग का वाढला, हे शोधणे या अभ्यासाचा उद्देश नव्हता; फक्त वेग बदलला की नाही, हे तपासले गेले. मात्र हा वाढलेला वेग सध्याच्या हवामान प्रारूपांच्या (क्लायमेट मॉडेल्स) अंदाजांशी जुळतो, असे संशोधक सांगतात.
पाचही नोंदींमध्ये एकच निष्कर्ष
नासा, नोआ, हॅडक्रट, बर्कली अर्थ आणि ईआरए५ या जगातील पाच प्रमुख तापमान नोंदसंचांचा अभ्यास करण्यात आला. कोणताही संच घ्या किंवा कोणतीही गणिती पद्धत वापरा, निष्कर्ष एकच आला. तापमानवाढीचा वेग वाढला आहे. हा निष्कर्ष ९८ टक्क्यांहून अधिक खात्रीने सांगता येतो, असे प्रमुख लेखक स्टीफन रामस्टॉर्फ यांनी स्पष्ट केले. म्हणजे हा बदल सामान्य चढउतार नाही, हे जवळजवळ निश्चित आहे.
२०२३-२४ चा भीषण उकाडा ‘अपवाद’ नव्हता
२०२३ आणि २०२४ ही वर्षे अतिशय उष्ण होती. त्यात एल निनो आणि सूर्याच्या सुमारे ११ वर्षांच्या चक्रातील सर्वाधिक सक्रिय टप्प्याचाही (सोलार मॅक्झिमम) वाटा होता. त्यामुळे या दोन वर्षांमुळेच वेग वाढलेला दिसतोय का, हा प्रश्न होता. पण नैसर्गिक परिणाम वजा केल्यानंतरही ही दोन्ही वर्षे नोंदींच्या इतिहासातील सर्वात उष्ण ठरली. शिवाय वेग वाढण्याची चिन्हे २०१३-१४ पासूनच पाचही संचांत दिसू लागली होती. म्हणजे हा निष्कर्ष केवळ अलीकडच्या उष्ण वर्षांवर आधारलेला नाही.
२०३० पूर्वीच धोक्याची रेषा?
पॅरिस करारानुसार जगाने पृथ्वीचे दीर्घकालीन तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा १.५ अंशांपेक्षा जास्त वाढू न देण्याचा प्रयत्न करायचे ठरवले आहे. ही मर्यादा एखाद्या उष्ण वर्षाबद्दल नसून सलग दीर्घकाळाच्या तापमानाबद्दल आहे. गेल्या दहा वर्षांचा वेग कायम राहिला, तर २०३० पूर्वीच ही मर्यादा कायमस्वरूपी ओलांडली जाईल, असा इशारा रामस्टॉर्फ यांनी दिला आहे. पृथ्वी पुढे किती वेगाने तापेल, हे शेवटी कोळसा, तेल, वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांमधून होणारे कार्बन डायआॅक्साइडचे उत्सर्जन आपण किती लवकर शून्यावर आणतो, यावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले. हे संशोधन ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
Read About : Climate Change Wheat Protein : वाढत्या CO₂ मुळे गव्हातील प्रथिनांमध्ये बदल, चपातीची गुणवत्ता खराब होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.