चिकलठाणा एमआयडीसी परिसरात नवजात मुलगी कचऱ्यात आढळली; नागरिकाने कुत्र्याच्या तावडीतून केली सुटका, मात्र उपचारांपूर्वीच चिमुकलीचा मृत्यू.
Chikalthana Newborn Baby Death : ज्या आई-वडिलांच्या कुशीत एका नवजात बाळाला सुरक्षितता मिळायला हवी, त्याच जन्मदात्यांनी अवघ्या काही तासांच्या चिमुकलीला कचऱ्यात टाकल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलेल्या या नवजात मुलीला भटक्या कुत्र्याने तोंडात धरून नेलं. मात्र, एका जागरूक नागरिकाने प्रसंगावधान राखत कुत्र्याचा पाठलाग केला आणि बाळाची सुटका केली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवाने तिचा जीव वाचू शकला नाही.
चिकलठाणा परिसरात नेमकी काय घडली घटना?
१८ नोव्हेंबरच्या रात्री साधारण ११ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील धूत हॉस्पिटलच्या पार्किंगजवळ, बीएमडब्ल्यू शोरूमसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका नवजात मुलीला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून टाकण्यात आलं होतं.
याचदरम्यान बळीराम गव्हाणे यांना एका भटक्या कुत्र्याच्या तोंडात नवजात बाळ दिसलं. त्यांनी तातडीने कुत्र्याचा पाठलाग करून त्याला हुसकावून लावलं आणि चिमुकलीची सुटका केली. त्यानंतर त्यांनी ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
घाटी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी मृत घोषित केलं
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नवजात मुलीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, थंडी आणि कुत्र्यांच्या चाव्यांमुळे तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
अज्ञात पालकांविरोधात गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी अज्ञात जन्मदात्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवजात मुलीला कचऱ्यात टाकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. मुलगी नको असणं किंवा अन्य कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
बाळाचा सांभाळ शक्य नसेल तर १०९८ वर संपर्क साधा
दरम्यान, बाळाचा सांभाळ करणं शक्य नसेल, तर त्याला कचऱ्यात किंवा असुरक्षित ठिकाणी सोडण्याऐवजी शासकीय यंत्रणांची मदत घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. यासाठी चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधता येतो.
एका निष्पाप जीवाला जन्मानंतर जगण्याची संधीही मिळाली नाही, या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. आता या चिमुकलीला असुरक्षित अवस्थेत सोडणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिस कधी लावतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read About : Pune Doctor Job Scam : सरकारी नोकरीच्या आमिषाने 11 डॉक्टरांची फसवणूक? प्रत्येकी 10 लाखांचा आरोप!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.