देशातील ३२ बनावट विद्यापीठांची यूजीसीकडून यादी जाहीर | महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर: Ugc List 32 Fake Universities – उच्च शिक्षणासाठी विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल ३२ बनावट विद्यापीठे व अनधिकृत शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. या संस्थांना विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष, वेळ आणि लाखो रुपयांचे शुल्क वाया जाण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी यूजीसीने ही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध केली असून, प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्थेची अधिकृत मान्यता तपासण्याचे आवाहन केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर केलेल्या राज्यनिहाय बनावट विद्यापीठांच्या यादीत देशातील ३२ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन संस्थांचा यादीत समावेश यूजीसीने जाहीर केलेल्या ३२ अनधिकृत संस्थांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी आणि सोलापूर जिल्ह्यातील नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ या संस्थांचा समावेश आहे. या संस्थांना पदवी प्रदान करण्याचा अधिकृत अधिकार नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. केवळ विद्यापीठाच्या नावात ‘युनिव्हर्सिटी’ किंवा ‘विद्यापीठ’ असा उल्लेख असल्याने त्या संस्थेला मान्यता आहे, असे समजू नये.
दिल्लीमध्ये सर्वाधिक १२ बनावट संस्था
देशभरातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या अनधिकृत संस्थांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये दिल्लीमध्ये सर्वाधिक १२ संस्थांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात चार संस्था, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी येथे प्रत्येकी दोन संस्थांचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील संस्थांचाही या यादीत समावेश आहे. या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्यांना कायदेशीर मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा सरकारी व खासगी नोकरीसाठी अर्ज करताना अडचणी येऊ शकतात.
विद्यार्थ्यांचे नेमके काय नुकसान होऊ शकते?
बनावट किंवा अनधिकृत विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. संस्थेला कायदेशीर अधिकार नसल्यास तेथून मिळालेल्या पदवीला मान्यता मिळणार नाही. सरकारी भरती किंवा खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही. पदव्युत्तर शिक्षण, पीएच.डी. किंवा इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शैक्षणिक खर्च वाया जाऊ शकतात. अनेक वर्षे शिक्षण घेतल्यानंतर पदवी अमान्य ठरल्यास विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते.
राज्यनिहाय बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
दिल्ली: ऑल इंडिया इन्स्टट्यिूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ-एम्प्लॉयमेंट इंडिया, आध्यात्मिक विश्वविद्यालय (स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी), वर्ल्ड पीस ऑफ युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, माउंटन इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट सोल्यूशन, केरळ: सेंट जॉन युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेटिक मेडिसिन, महाराष्ट्र: राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ, पश्चिम बंगाल : इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, इन्स्टट्यिूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, उत्तर प्रदेश: गांधी हिंदी विद्यापीठ, महामाया टेक्निकल (प्राविधिक) युनिव्हर्सिटी, नेताजी सुभाषचंद्र बोस युनिव्हर्सिटी (ओपन युनिव्हर्सिटी), भारतीय शिक्षा परिषद, पुदुच्चेरी: श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, उषा लच्छुमनन कॉलेज ऑफ एज्युकेशन, आंध्र प्रदेश : क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया, अरुणाचल प्रदेश: इंडियन इन्स्टट्यिूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, हरियाणा : मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, कर्नाटक : सर्व भारतीय शिक्षा पीठ, ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी, राजस्थान : राजीव गांधी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, झारखंड: दक्ष युनिव्हर्सिटी (व्होकेशनल अँड लाइफ स्किल एज्युकेशन).
Read About : Mba Cet New Exam Pattern 2027 – 28- एमबीए प्रवेशासाठी आता नवा परीक्षा पॅटर्न
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.