Ad Advertisement Ad Advertisement

Ice Cream vs Frozen Dessert – तुमच्या आवडत्या आईस्क्रीमचे गुपित काय? दूध की पाम तेल?

९५ टक्के ग्राहकांना फरक माहीत नसल्याचा दावा, गुजरातमध्ये ‘ऑपरेशन हेल्थ’ मोहीम सुरू, आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट दिसायला व चवीला सारखेच, मात्र दोन्हींच्या घटकांमध्ये मोठा फरक असल्याने ग्राहकांना माहिती देण्यासाठी गुजरात सरकारचा पुढाकार

गांधीनगर : Ice Cream vs Frozen Dessert – आईस्क्रीमचा थंडगार घास घेताना तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे खरोखर दुधापासून बनले आहे की पाम तेलापासून? दिसायला आणि चवीला सारखे वाटणारे आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट हे मात्र वेगवेगळे पदार्थ आहेत. ग्राहकांना हा फरक समजावा आणि खरेदी करताना फसगत होऊ नये, यासाठी गुजरात सरकारने ‘ऑपरेशन हेल्थ’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. आरोग्यमत्री प्रफुल पानशेरिया यांनी बुधवारी याची घोषणा केली.

आरोग्य विभाग आणि अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जाणार आहे. दोन्ही पदार्थांची विक्री कायदेशीर आहे. मात्र, त्यातील फरक अनेक ग्राहकांना माहीत नसल्याचे मंत्र्यानी सांगितले.

दुधाचे आईस्क्रीम की पाम तेलाचे डेझर्ट?

खऱ्या आईस्क्रीममध्ये दुधातील स्निग्धांश वापरला जातो. तर फ्रोझन डेझर्टमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, प्रामुख्याने पाम तेल आणि दूध पावडर वापरली जाते. दोन्ही पदार्थ दिसायला आणि चवीला सारखे असल्याने ग्राहकांची गल्लत होते. ९५ टक्क्यांहून अधिक लोकांना आपण नेमके काय खात आहोत, याची माहिती नसल्याचा दावा पानशेरिया यांनी केला.

आता दुकानदारांना द्यावी लागणार माहिती

या मोहिमेनुसार गुजरातमधील विक्रेत्यांना त्यांच्याकडील पदार्थ शुद्ध दुधाचे आईस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट, हे ग्राहकांना स्पष्टपणे सांगावे लागणार आहे. दुकानांमध्ये दोन्ही पदार्थांतील फरक दाखवणारे फलकही लावावे लागतील. उत्पादक कंपन्यांनाही पाकिटावर पदार्थाचे नाव आणि प्रकार स्पष्टपणे लिहावा लागणार आहे.

अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाचे अधिकारी शहरांपासून तालुक्यांपर्यंत जनजागृती करणार आहेत. नागरिकांनीही समाजमाध्यमांवर योग्य माहिती पसरवावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यानी केले आहे. यापूर्वी पनीर, चीज आणि बटर यांबाबत झालेल्या जनजागृतीप्रमाणेच या मोहिमेलाही प्रतिसाद मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

आईस्क्रीम की फ्रोझन डेझर्ट? असा ओळखा फरक

आईस्क्रीम तयार करताना दुधातील स्निग्धांशाचा वापर केला जातो. याउलट, फ्रोझन डेझर्ट बनवण्यासाठी पाम तेलासारखे वनस्पती तेल आणि दूध पावडर वापरली जाते. दोन्ही पदार्थ दिसायला आणि चवीला सारखे वाटू शकतात. त्यामुळे खरेदी करताना पाकिटावरील पदार्थाचे नाव, घटकांची यादी आणि पोषणमूल्यांची माहिती काळजीपूर्वक वाचा. यामुळे आपण नेमका कोणता पदार्थ खरेदी करत आहोत, हे समजण्यास मदत होते.

Reab About: May 2024 Solar Storm : सौरवादळाने पृथ्वीचे अभेद्य किरणोत्सार विरोधी कवच भेदले!; किलर इलेक्ट्रॉन्सच्या संख्येत तब्बल ५,००० पट वाढ!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.