Ad Advertisement Ad Advertisement

India Poverty Rate 2023 – भारतातील गरिबीत ऐतिहासिक घट!

जागतिक बँकेच्या अहवालाचा हवाला देत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

India Poverty Rate 2023 : नवी दिल्ली : भारतातील गरिबी निर्मूलनाबाबत जागतिक बँकेने जाहीर केलेल्या एका अहवालाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. गरिबीतील ही ‘ऐतिहासिक’ घट म्हणजे देशातील नव्या पिढीसाठी संधींचा झालेला उदय आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसच्या ‘गरिबी हटाओ’ घोषणेवर जोरदार टीका केली. गरिबी निर्मूलन हे आमच्या सरकारसाठी केवळ एक घोषणा नसून, ती एक दृढ वचनबद्धता आहे, असे मोदी म्हणाले. जगात सर्वात वेगाने गरिबी कमी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी रविवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘दसवी’ या बॉलीवूड चित्रपटातील ‘ठान लिया’ हे प्रेरणादायी गाणे बॅकग्राऊंडला ठेवत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आर्थिक प्रगतीची आकडेवारी मांडली. गेल्या अवघ्या सहा वर्षांत भारतात १३.४ कोटी रोजगार वाढले आहेत. हे भारताच्या नोकरीक्षम वयोगटातील लोकसंख्येच्या वाढीपेक्षा दुप्पट आहेत. यासोबतच देशातील आर्थिक असमानताही झपाट्याने कमी झाली आहे.

आर्थिक असमानता मोजण्यासाठी वापरला जाणारा ‘गिनी इंडेक्स’ २० टक्क्यांहून अधिक घसरून २३.० वर पोहोचला आहे. आर्थिक आणि बिगर-आर्थिक अशा दोन्ही निकषांवर भारताने गेल्या दशकात गरिबी कमी करण्यात मोठी झेप घेतली असल्याचे जागतिक बँकेने मान्य केले आहे, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. पंतप्रधानांच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये वापरलेले सुखविंदर सिंग यांचे गाणे देशाच्या याच आत्मविश्वासाचे आणि जिद्दीचे प्रतीक म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे.

तब्बल ४९.६ कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर

जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, भारतात २०११ ते २०२३ या काळात तब्बल ४९.६ कोटी लोक गरिबी रेषेतून बाहेर आले आहेत. यामुळे देशातील अत्यंत गरिबीचा दर ९० टक्क्यांनी घसरला आहे. पूर्वी दर चार भारतीयांमध्ये एक जण अत्यंत गरीब होता, हे प्रमाण आता घसरून सुमारे ३८ भारतीयांमध्ये एक जण असे झाले आहे.

गरिबीचा दर २.६ टक्क्यांवर

२०११ मध्ये गरिबीचा हा दर २७.१ टक्के इतका होता, तो २०२३ मध्ये थेट २.६ टक्क्यांवर आला आहे. जागतिक बँकेने हे मूल्यांकन दैनंदिन ३ अमेरिकन डॉलर्सच्या अत्यंत गरिबीच्या मर्यादेवर आणि २०२१ च्या क्रयशक्ती समानतेवर आधारित आहे.

Read About : Microfinance Debt Crisis in Hingoli- मायक्रो फायनान्सच्या वसुलीचा जाच; वाघजाळीत भूमिहीन मजुरांनी घरे काढली विक्रीला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.