दुष्काळामुळे रोजगार ठप्प, कर्जाचे हप्ते थकल्याने वसुलीचा तगादा; घरांवर ‘घर विक्रीस आहे’चे फलक लावून निषेध
Microfinance Debt Crisis in Hingoli: वाघजाळी (जि. हिंगोली) : दुष्काळामुळे हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन ठप्प झाले आहे आणि दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने हिंगोली जिल्ह्यामधील सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी घर विकण्याची वेळ आल्याने काही कर्जदारांनी आपल्या घरांवरच ‘घर विक्रीस आहे’ असे फलक लावले आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील कर्जबाजारी कुटुंबांच्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
धम्मरत्न काळूराम मोरे आणि समाधान प्रल्हाद मोरे या भूमिहीन शेतमजुरांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे आणि यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थकारणावर परिणाम झाला आहे. शेतीची कामे कमी झाल्याने शेतमजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळत नाही. परिणामी, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की कर्जाचे हप्ते भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
बचत गटाच्या महिलांनी घेतले कर्ज
गावातील काही शेतमजूर आणि बचत गटांतील महिलांनी लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी १७ हजारांपासून ८० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेतल्याची माहिती आहे. या कर्जांची परतफेड सुरू असतानाच उत्पन्न घटल्याने हप्ते भरणे कठीण झाले आहे. हप्ते थकल्यानंतर वसुली प्रतिनिधींकडून वारंवार तगादा लावला जात असल्याची तक्रार कर्जदारांनी केली आहे. धम्मरत्न मोरे यांनी वसुली प्रतिनिधी घरात येऊन बसत असल्याचे आणि वारंवार विनवणी करूनही अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगितले. या मानसिक त्रासाला कंटाळून घर विक्रीला काढण्याची वेळ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गावातील चंद्रभागाबाई मोरे यांच्यासह अन्य महिलांनीही कर्जफेडीच्या अडचणी मांडल्या आहेत.
आंदोलनाचा इशारा
या प्रकाराची दखल घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात आवाज उठवला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतमजुरांच्या हाताला काम नसताना वित्तीय संस्थांकडून कर्जफेडीसाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी हस्तक्षेप करावा आणि संबंधित कंपन्यांच्या वसुली पद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी कावरखे यांनी केली. शेतमजूर कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर संघटनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Read About : Jio Platforms IPO- जिओच्या आयपीओने इतिहास रचला 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.