शिक्षणाबाबत भारतीय विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता; ८२ टक्के विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतींना प्राधान्य
AI impact on Indian students : लंडन : झपाट्याने वाढत असलेल्या कृत्रिम बुद्घिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे काम जलदगतीने होत आहे. परंतु यामुळे विषयाचे सखोल ज्ञान आणि आकलन कमी होत असल्याची मोठी चिंता भारतीय विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक सर्वेक्षण अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.
‘एचपी फ्युचर्स २०२६’च्या अहवालात जगभरातील ६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात ७५८ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या अहवालानुसार भारतीय विद्यार्थ्यांनी एआयमुळे काम वेगाने होत असल्याचे मान्य केले आहे. परंतु विषय सखोलपणे समजून घेण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. विषय सखोलपणे समजून घेण्यासाठी अजूनही विद्यार्थ्यांनी जुन्या पारंपरिक पद्धतीवर विश्वास दाखवला आहे.
८२ टक्के भारतीय विद्यार्थ्यांनुसार एखादा विषय दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी ते प्रिंटिंग किंवा हाताने नोट्स काढण्याच्या जुन्या पद्धतींवर भर देतात. एका बाजूला एआयमुळे बौद्धिक क्षमता खालावण्याची भीती वाटत असली तरी भविष्यातील एआय-केंद्रित जगाबद्दल भारतीय विद्यार्थी प्रचंड आशावादी आहेत. एआयमुळे जितक्या नोकऱ्या संपुष्टात येतील, त्यापेक्षा अधिक प्रमाणात नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास तब्बल ७८ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
भविष्यात आपल्या रोजगारात एआय साधनांचा प्रभावीपणे आणि जबाबदारीने वापर करू, असे मत ८७ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदवले आहे. तर आपले शिक्षण भविष्यातील एआय केंद्रित नोकऱ्यांसाठी पूरक असल्याचे सर्वेक्षणातील ९२ टक्के विद्यार्थ्यांना वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी एचपी, ग्लोबल लर्निंग काउंसिल आणि एज्युकेशन लीडर्स फोरमच्या नेतृत्वात हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
शिक्षण, धोरण आणि भविष्यातील रोजगार क्षेत्रातील संबंधित ५८ तज्ज्ञांचा यात समावेश आहे. अहवालातून जगभरातील धोरणकर्त्यांना भविष्यातील रोजगार लक्षात घेत त्यानुसार स्पष्ट योजना बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मूलभूत शिक्षण आणि शाश्वत कौशल्ये एकत्र शिकवण्यासाठी सर्जनशील पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
युवकांना भविष्यासाठी तयार करण्याची गरज
एआय तंत्रज्ञान झपाट्याने वाढत असून काम करण्याच्या पद्धतीत बदल होत आहे. त्यामुळे भविष्यातील आव्हानात्मक रोजगारासाठी युवकांना तयार करणे हे शिक्षक, धोरणकर्ते आणि कंपन्यांची सामायिक जबाबदारी असल्याचे एचपीचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी आणि एचपी फ्यूचर्सचे अध्यक्ष डेव्हिड मॅकक्वेरी यांनी स्पष्ट केले. विशेषत: शिक्षण क्षेत्राने ही गोष्ट लक्षात घेऊन बदल करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
Read About : Aadhaar Uidai AI Mascot आधार कार्डबाबत समस्या? ‘उदय’ आहे ना…तब्बल 11 प्रमुख भाषांत आधार अपडेट
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.