Ad Advertisement Ad Advertisement

Investment Scam Sambhajinagar – 20 दिवसांत दामदुप्पटचे आमिष दाखवून गंडवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

दोन महिलांसह तिघांना बेड्या : मुंबई, गुजरात, बीडमधील ठगांचा साखळी पद्धतीने लुबाडण्याचा कारनामा

छत्रपती संभाजीनगर : Investment Scam Sambhajinagar गोव्यातील कॅसिनोमध्ये गुंतवणूक करून अवघ्या २० दिवसांत रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना लुबाडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. गेट वे हेल्प नावाच्या ऑनलाइन साखळी योजनेद्वारे फसवणूक करणाऱ्या कंपनीचा एमडी आणि दोन महिला एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, गुंतवलेले पैसे परत मागितल्यावर तुझे हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी या टोळीने तक्रारदाराला दिली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

संदीप शिवदास जाधव (वय ४६, रा. मां गायत्री चाळ, रूम नं. १, विरार पूर्व, पालघर, मुंबई), प्रतिभा आशिषकुमार पांडे – शुक्ला (वय ४२, रा. फ्लॅट नं. ५०२, रवि शिखर-२, चहनी व्हिलेज, वडोदरा, गुजरात) आणि आशा सखाराम देवकर (वय ४२, रा. स्वराज्य नगर, बार्शी रोड, बीड) या तिघांना अटक केली आहे. त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
शेतकरी नरसिंग दौलतसिंग महेर (वय ५२, रा. कच्चीघाटी, वरुड, छत्रपती संभाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नरसिंग महेर यांना ओळखीच्या चतुरसिंग शिंदे यांच्याकडून हातउसने दिलेले ३० हजार रुपये घ्यायचे होते. पैशांसाठी भेटल्यावर शिंदेने महेर यांना गेट वे हेल्प कंपनीची माहिती दिली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी जालना रोडवरील हॉटेल इंडियाना येथे महेर यांची कंपनीचा एमडी संदीप जाधव, एजंट प्रतिभा पांडे आणि आशा देवकर यांच्याशी भेट घडवून आणली. कंपनी गोव्यातील कॅसिनोमध्ये पैसे गुंतवून मोठा नफा कमावते, असे सांगत दररोज १० टक्के कमिशन व २० दिवसांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष त्यांनी दाखवले. तसेच इतर गुंतवणूकदार आणल्यास ३ ते ८ टक्के कमिशनचेही प्रलोभन दिले होते.

सुरुवातीला ६ हजार दिले, नंतर फोन बंद

आरोपींच्या भूलथापांना बळी पडून महेर यांनी शिंदे यांच्याकडून मिळालेले १० हजार रुपये जाधवकडे दिले. जाधवने महेर यांच्या मोबाईलवर कंपनीच्या ॲपमध्ये ऑनलाइन आयडी उघडून दिला आणि हस्तलिखित पावती दिली. दररोज १ हजार रुपये (१० डॉलर) टोकन पॉकेटमध्ये जमा होतील, असे सांगण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीच्या दिवसांत महेर यांना टोकन ॲपमधून थोडे-थोडे करून टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये रोख काढून दिले. मात्र, त्यानंतर अचानक ॲपमध्ये पैसे जमा होणे बंद झाले आणि आरोपींनी फोन उचलणेही टाळले.

लोकेशन टाक, तिथे येऊन हातपाय तोडते!

११ नोव्हेंबर रोजी ही टोळी पुन्हा शहरात आल्याचे समजताच महेर यांनी आशा देवकरला फोन केला. त्यावर तुझे पैसे आता मिळणार नाहीत, तुझे लोकेशन टाक, तिथे येऊन मी तुझे हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी देवकरने दिली. १२ नोव्हेंबर रोजी हे तिघे पुन्हा हॉटेल इंडियाना येथे आल्याचे समजताच महेर यांनी पोलिसांत धाव घेतली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) आणि बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

असा लावायचे चुना!

१. मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन गुंतवणुकदार शोधायचे.
२. डॉलरमध्ये परताव्याचे आभासी आकडे दाखवायचे.
३. सुरुवातीला थोडे पैसे द्यायचे आणि नंतर विश्वासघात करायचा.

Read About : Beed Land Mafia Gang in CSN – दीड एकर जमिनीचा 14 कोटींत सौदा करून 65 लाख उकळले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.