Ad Advertisement Ad Advertisement

Jadarite Real Kryptonite : सुपरमॅनला कमजोर करणारा खनिज दगड खऱ्या जगातही अस्तित्वात !

सर्बियातील जॅडार खोऱ्यात २००४ मध्ये सापडलेल्या जॅडाराइटला २००६ मध्ये स्वतंत्र खनिज म्हणून मान्यता

बेलग्रेड : Jadarite Real Kryptonite सुपरमॅनला कमजोर करणारा हिरव्या रंगाचा ‘क्रिप्टोनाइट’ हा खनिज दगड चित्रपटातील एक कल्पना आहे. मात्र, त्याच्याशी विलक्षण साम्य असलेले एक दुर्मीळ खनिज सर्बियामध्ये सापडले आहे. ‘जॅडाराइट’ असे या खनिजाचे नाव असून, त्याचा शोध २००४ मध्ये सर्बियातील जॅडार खोऱ्यात लागला. खाण क्षेत्रातील कंपनी रिओ टिंटोच्या भूवैज्ञानिकांनी हा शोध लावला. वैज्ञानिक विश्लेषणानंतर २००६ मध्ये त्याला स्वतंत्र खनिज म्हणून अधिकृत मान्यता मिळाली.

जॅडाराइटची रासायनिक रचना सोडियम-लिथियम-बोरॉन-सिलिकेट-हायड्रॉक्साइड अशी आहे. २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपरमॅन रिटर्न्स’ चित्रपटात दाखवलेल्या क्रिप्टोनाइट या खनिजाच्या रासायनिक वर्णनाशी त्याचे विलक्षण साम्य आहे. त्यामुळे या खनिजाला ‘खऱ्या जगातील क्रिप्टोनाइट’ म्हटले जाते. मात्र, चित्रपटातील हिरव्या रंगाच्या चमकदार दगडाच्या विपरीत जॅडाराइट पांढऱ्या रंगाचा असून त्यात कोणतीही अलौकिक शक्ती नाही.

लिथियममुळे ऊर्जा क्षेत्रात महत्त्व

ऑस्ट्रेलियाच्या अणुविज्ञान व तंत्रज्ञान संस्थेतील (ॲन्स्टो) शास्त्रज्ञ मायकेल पेज यांच्या मते, जॅडाराइट हा लिथियम आणि बोरॉनचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. लिथियमचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या रिचार्जेबल बॅटरी आणि ऊर्जा साठवण यंत्रणांमध्ये होतो. तर बोरॉनचा उपयोग काच, सिरॅमिक आणि प्रगत औद्योगिक साहित्यनिर्मितीत केला जातो. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणात या खनिजाला महत्त्व आहे.

पर्यावरणाच्या चिंतेमुळे खाण प्रकल्प रद्द

जॅडाराइटचे मोठे साठे उत्खननासाठी उपलब्ध असल्याने रिओ टिंटोने मोठा खाण प्रकल्पाची योजना तयार केली होती. मात्र, स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणवादी संघटनांनी जलप्रदूषण, जमिनीचा ऱ्हास आणि जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. देशभर झालेल्या आंदोलनांनंतर सर्बिया सरकारने जानेवारी २०२२ मध्ये प्रकल्पाचा आराखडा आणि परवाने रद्द केले. त्यामुळे या खनिजाच्या व्यावसायिक उत्खननाचा मार्ग सध्या अडलेला आहे.

Read About: Barreleye Fish : पारदर्शक डोक्याचा दुर्मीळ Barreleye Fish पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद! हिरवे डोळे पाहून शास्त्रज्ञही थक्क
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.