पत्नीने महिनाभरापूर्वीच पोलिसांत केली होती तक्रार, चौघांवर गुन्हा दाखल
उमरी Nanded Farmer Death : गणीपूर (ता. उमरी, जि. नांदेड) येथील एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा बोळसा रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (दि. १५) मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खासगी फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कर्जवसुलीसाठी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप मृत शेतकरी दत्ता मोहन उमाटे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून महिंद्रा होम फायनान्सच्या राम गवलवाड, राजू चोंडीकर, सचिन लांडगे आणि अरविंद जाधव या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध उमरी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी दत्ता उमाटे यांनी २०१८ मध्ये घर बांधकामासाठी महिंद्रा होम फायनान्सच्या नांदेड शाखेतून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानुसार नियमित हप्ते भरत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, २०२६ मध्येही हप्ते भरून शिल्लक रक्कम व व्याजाबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार तगादा लावला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दि. १७ ऑक्टोबर रोजी तसेच दि. १४ नोव्हेंबर रोजी कर्ज वसुलीच्या कारणावरून कर्मचाऱ्यांनी घरी येऊन पैशांची मागणी केल्याचेही तक्रारदार पार्वतीबाई उमाटे (वय ५०) यांनीे म्हटले आहे. या प्रकारामुळे पती मानसिक तणावात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी दत्ता मोहन उमाटे (वय ५२, रा.गणीपूर, ता. उमरी, जि. नांदेड) यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उमाटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, खासगी फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वारंवार वसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
महिनाभरापूर्वी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार
विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी मृत शेतकऱ्याच्या पत्नीने संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात उमरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, शेतकरी कुटुंबाच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी फायनान्स कंपनीच्या तक्रारीवरून मृत शेतकऱ्यासह अन्य शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची नाराजी नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
Read About : Maharashtra E-Peek Pahani Deadline – ई-पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.