Ad Advertisement Ad Advertisement

JCB Excavation Controversy – जेसीबीने खोदले खड्डे : रोलरने सपाटीकरण; सभापतींसह मुख्याध्यापकांनाही थांगपत्ता नाही

जेसीबीने खोदले खड्डे : रोलरने सपाटीकरण; सभापतींसह मुख्याध्यापकांनाही थांगपत्ता नाही

JCB Excavation Controversy छत्रपती संभाजीनगर – जिल्हा परिषद शाळांच्या मैदानांवर परस्पर जेसीबी आणून क्रीडांगण उभारणीची कामे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही कामे कोणाच्या आदेशाने सुरू आहेत, कोणत्या यंत्रणेमार्फत केली जात आहेत आणि त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतली आहे का, याची साधी माहितीही शिक्षण विभागाकडे नसल्याचे उघड झाले. विभागाच्या बैठकीत सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर शिक्षणाधिकारी निरुत्तर झाले, तर सभापतींनी थेट चौकशीचे आदेश दिले. मात्र, शिक्षण संभापती या फक्त बैठकीपुरत्याच उपस्थित राहतात त्यांचे पतीच कामे बघतात त्यामुळेच ही परिस्थिती झाली असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरु आहे.

जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य केतन काजे यांनी कन्नड तालुक्यातील वासडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार उघडकीस आणला. शाळेच्या मैदानावर जेसीबीने खड्डे खोदण्यात येत असून, रोलरच्या साहाय्याने सपाटीकरण केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. हे काम कोण करीत आहे? शिक्षण विभागाची परवानगी घेतली आहे का? शाळेच्या आवारात परस्पर काम सुरू असताना मुख्याध्यापकांनी आक्षेप का घेतला नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांवर शिक्षणाधिकारी संघरत्न सरवदे यांच्यासह संबंधित अधिकारी अवाक झाले. याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या मैदानांवर नेमके कोणाच्या अधिकारात कामे सुरू आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देऊन क्रीडांगण उभारणीच्या कामांची माहिती घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी किती शाळांमध्ये अशा प्रकारे परस्पर कामे सुरू आहेत, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

आम्हाला माहितीच नाही

शिक्षण सभापती अनिता मोठे यांनी बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची आम्हाला माहितीच नाही. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात परवानगीशिवाय प्रवेश करून कामे करणे चुकीचे आहे. यापुढे कोणालाही परस्पर शाळेच्या आवारात काम करू देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. संबंधित मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे तसेच विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

शिक्षण सभापती बैठकांनाच येतात

शिक्षण समितीच्या सभापती अनिता मोठे या फक्त 2 बैठकीलाच हजर राहतात. त्यांचे पती ज्ञानेश्वर मोठे हेच सगळ्या कामांमध्ये हस्तक्षेप करतात. कामानिमित्त येणाऱ्या कर्मचारी, नागरिकांना सभापती कधीच भेटत नाहीत. नाईलाजास्तव त्यांच्या पतींना भेटावे लागते. ज्ञानेश्वर मोठे आठवड्यातून दोन दिवस जिल्हा परिषदेत येतात. सभापती येत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Read About : Robotic Cancer Surgery : एकाच दिवशी कर्करोगाच्या 5 गुंतागुंतीच्या रोबोटिक शस्त्रक्रिया!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.