Ad Advertisement Ad Advertisement

JSW Motors Chhatrapati Sambhajinagar Plant जेएसडब्ल्यू मोटर्सची मोठी झेप; 50 हून अधिक कंपन्यांसोबत भागीदारी

संभाजीनगरात जागतिक दर्जाची वाहननिर्मिती; पुढील महिन्यात पहिली हायब्रिड एसयूव्ही रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : JSW Motors Chhatrapati Sambhajinagar Plant औद्योगिक क्षेत्रात छत्रपती संभाजीनगरचे महत्त्व अधोरेखित करणारा आणखी एक मोठा प्रकल्प आकाराला येत आहे. जेएसडब्ल्यू मोटर्सने आपल्या पहिल्या प्लग-इन हायब्रिड एसयूव्हीच्या निर्मितीसाठी देश-विदेशातील ५० हून अधिक पुरवठादार कंपन्यांशी भागीदारी केली आहे. कंपनीच्या या नव्या एसयूव्हीचे पुढील महिन्यात रस्त्यावर धावतील. तिचे उत्पादन छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पात केले जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीने २७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची योजना आखली आहे. सुमारे ६०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता पाच लाख वाहनांची असेल. वाहननिर्मितीसाठी आवश्यक प्रेसिंग, पेंटिंग आणि असेंब्ली यांसारख्या सुविधा येथे विकसित केल्या जाणार असून, स्वतंत्र पुरवठादार पार्कही उभारण्यात येणार आहे. या एसयूव्हीसाठी चीनमधील चेरी ऑटोमोबॉइलच्या वाहन प्लॅटफॉर्मचा आधार घेण्यात आला आहे. मात्र, भारतीय रस्ते, इंधन आणि वाहन नियमांचा विचार करून त्यात आवश्यक बदल केले जात आहेत.

या प्रकल्पासाठी मदरसन, युनो मिंडा, टाटा एलेक्सी, भारती एअरटेल आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज यांसारख्या कंपन्या पुरवठा साखळीत सहभागी झाल्या आहेत. याशिवाय जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील कंपन्यांचाही सहभाग असणार आहे. वाहनातील महत्त्वाच्या सुट्या भागांचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर कंपनीचा भर आहे. तसेच इंजिन आणि पॉवरट्रेन यंत्रणा ई-२० इंधन आणि बीएस-६ फेज-२ उत्सर्जन निकषांनुसार विकसित केली जात आहे. वाहनातील कॅमेऱ्यांच्या फुटेजसह कनेक्टेड कारशी संबंधित माहिती भारतातील सर्व्हरवर साठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

औद्योगिक विस्ताराला नवी दिशा

भविष्यातील वाहन तंत्रज्ञानासाठी जेएसडब्ल्यू मोटर्सची गुगल आणि ओपनएआय यांच्याशीही चर्चा सुरू आहे. पहिल्या हायब्रिड एसयूव्हीनंतर कंपनी बॅटरी इलेक्ट्रिक, रेंज एक्स्टेंडेड इलेक्ट्रिक आणि अन्य स्वच्छ ऊर्जा आधारित वाहनांच्या निर्मितीतही उतरणार आहे. जेएसडब्ल्यू मोटर्सचा हा प्रकल्प केवळ वाहननिर्मितीपुरता मर्यादित नसून, त्यातून छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहन उद्योगाशी संबंधित पूरक उद्योगांचे मोठे जाळे विकसित होण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग वाढल्याने स्थानिक औद्योगिक परिसंस्थेला तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे. .

Read About: Amanda Seyfried – एलिझाबेथ होम्सच्या भूमिकेवर बिली इव्हान्सची सूचक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तिला चित्रपटात घेतल्याचा आनंद’

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.