Ad Advertisement Ad Advertisement

Sambhajinagar House Burglary – बंद घरे टार्गेट; दोन घरे फोडून 21 तोळे सोने लंपास

नागेश्वरवाडी, इटखेड्यातील घटना : दोन्ही घरे पाच दिवस होती बंद

छत्रपती संभाजीनगर : Sambhajinagar House Burglary दिवाळीच्या सुट्यांमध्ये कुटुंबीय बाहेरगावी जाताच चोरांनी बंद घरांना टार्गेट करून मोठा डल्ला मारला. सातारा ठाण्याच्या हद्दीतील इटखेड्यातून १८ तोळे आणि क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वरवाडीतून २७ ग्रॅम, असा अंदाजे २१ तोळे सोन्याचा ऐवज चोरांनी लंपास केला. बाजारमुल्यानुसार या दागिन्यांची किंमत अंदाजे १५ लाख रुपये होते. या घटना १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान घडल्या.

विजय मधुकर जवरे (वय ५३, रा. रो-हाऊस क्र. ३, आशीर्वाद, वास्तू प्रतिभा अपार्टमेंटसमोर, इटखेडा) हे फिर्यादी आहेत. १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जवरे कुटुंबीय घराला कुलूप लावून मूळगावी बुलढाणा येथे गेले. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ते परतले असता, कुलूप तोडलेले आणि घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. बेडरूममधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते, तर लॉकरमधील दागिने व रोकड गायब होती. चोरांनी घरातून सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे लाँग गंठण, सव्वा दोन तोळ्याचे मिनी गंठण, तीन तोळ्याच्या दोन बांगड्या, तीन तोळ्याचे वेढे, दीड तोळ्याची गोफ, सव्वा तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याच्या दोन अंगठ्या, लहान मुलांचे दोन तोळ्याचे दागिने (जिवती, ओम, अंगठ्या, बाळ्या), २० तोळ्याचे चांदीचे पैंजण आणि २० हजारांची रोकड, असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक निर्मला राख करत आहेत.

नागेश्वरवाडीत रिक्षाचालकाचे घर फोडले

दुसऱ्या घटनेत, नागेश्वरवाडी येथील रिक्षाचालक स्वप्निल रामदास पवार (वय ३१) हे १० नोव्हेंबरला दुपारी साडेचार वाजता पत्नी व आईसह घराला कुलूप लावून अहिल्यानगर येथे गेले होते. दरम्यान, चोरांनी घराचा कडी-कोंडा तोडून कपाटातील १६ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, ५ ग्रॅमची कर्णफुले, ४ ग्रॅमचे पेंडंट आणि २ ग्रॅमचे डोरले व मणी असा ऐवज लंपास केला. १५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता शेजारी राजेंद्र रवी यांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर ही घरफोडीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

सीसीटीव्ही लावण्यापूर्वीच चोरांनी साधला डाव

इटखेड्यातील विजय जवरे हे राज्य आरोग्य विभागात तर त्यांची पत्नी अन्न व औषधी विभागात (एफडीए) नोकरीला आहे. ते दीड महिन्यापूर्वीच नवीन घरात राहायला गेले होते. त्यांनी तेथे सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरु केले होते. त्याची वायरिंगही पूर्ण झालेली आहे. मात्र, कॅमेरे लावण्यापूर्वीच ते दिवाळीनिमित्त गावी गेले. सुटीहून आल्यावर ते कॅमेरे लावणार होते, पण त्यापूर्वीच चोरांनी डाव साधला. विशेष म्हणजे, काहीही सुरक्षा नसताना १८ तोळ्यांचा ऐवज घरात ठेवून गेल्यामुळे त्यांचा निष्काळजीपणाही दिसून येतो.

Read About : Son Kills Father in Chhatrapati Sambhajinagar – स्वयंपाक आवडला नाही म्हणून अर्धांगवायूग्रस्त वडिलांचा गळा घोटला
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.