ढिगाऱ्याखाली आणखी आठ जणांचा शोध सुरू, निष्काळजीपणाप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ कर्मचाऱ्यांवर कारवाई
कराची : Karachi Building Collapse पाकिस्तानच्या कराची शहरातील बलोच कॉलनी परिसरात सहा मजली निर्माणाधीन इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. शनिवारी बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून आणखी तीन मृतदेह बाहेर काढले असून, किमान आठ जणांचा अद्याप शोध सुरू आहे.
बुधवारी ही इमारत कोसळल्यानंतर सुरुवातीला तिघांचा मृत्यू झाला होता, तर १४ जण गंभीर जखमी झाले होते. रेस्क्यू ११२२ च्या जवानांकडून अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बचाव कार्यादरम्यान शुक्रवारी तब्बल ५४ तास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका २८ वर्षीय तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
प्रशासनाची कठोर कारवाई
या घटनेनंतर सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कठोर पावले उचलत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. तसेच, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीच्या १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या हलगर्जीपणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याप्रकरणी इमारतीचे मालक, बिल्डर, वास्तुविशारद (आर्किटेक्ट), स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, कराची आयुक्त कार्यालयाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम उघडत शहरातील ५१६ इमारती सील केल्या आहेत.
निकृष्ट बांधकाम आणि सुरक्षा नियमांच्या अभावामुळे पाकिस्तानात अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी पेशावरमधील अफ्रिदी आबाद परिसरात शाळेची इमारत कोसळून ३० विद्यार्थी आणि एका शिक्षिकेसह ३१ जणांचा मृत्यू झाला होता.
Read About : सात हजार टन डिझेल असलेले तेलवाहू जहाज समुद्रात उलटले
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.