Ad Advertisement Ad Advertisement

Krithi Shetty Hum Tere Pyaar Mein – रोहितच्या प्रेमकथेत क्रितीची शेट्टीची वर्णी

‘हम तेरे प्यार में’मधून बॉलिवूडमध्ये मुख्य नायिका म्हणून पदार्पण, कोण बनणार दिग्दर्शक?

मुंबई : Krithi Shetty Hum Tere Pyaar Mein – उडणाऱ्या गाड्या, जबरदस्त ॲक्शन आणि धमाल कॉमेडीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता रोहित शेट्टी आता प्रेक्षकांसाठी एक खास प्रेमकथा घेऊन येत आहेत. या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रिती शेट्टी बॉलिवूडमध्ये मुख्य नायिका म्हणून पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे नावही समोर आले असून, ‘हम तेरे प्यार में’ असे त्याचे नाव असल्याची माहिती आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोहित शेट्टींच्या पाठबळावर साकारल्या जाणाऱ्या या नव्या प्रेमकथेबाबत उत्सुकता वाढली आहे.

जुन्या प्रेमाची आठवण करून देणार नाव

चित्रपटाच्या कथेला साजेसे असे ‘हम तेरे प्यार में’ हे नाव निवडण्यात आले आहे. या नावात जुन्या काळातील प्रेमकथांचा गोडवा आणि वेगळीच मोहिनी असल्याची माहिती आहे. तरुणांसोबतच सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना हे नाव आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र, चित्रपटाची कथा आणि क्रितीच्या भूमिकेबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

१७ वर्षांच्या मेहनतीनंतर दिग्दर्शनाची संधी

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विधी घोडगावकर यांच्याकडे असणार आहे. गेल्या १७ वर्षांपासून त्या रोहित शेट्टी याच्यासोबत काम करत आहेत.’गोलमाल ३’, ‘सिंघम’, ‘बोल बच्चन’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘गोलमाल अगेन’ आणि ‘सिम्बा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. याशिवाय ‘सूर्यवंशी’, ‘सर्कस’, ‘इंडियन पोलीस फोर्स’ आणि ‘सिंघम अगेन’च्या लेखन चमूतही त्यांचा सहभाग होता. आता ‘हम तेरे प्यार में’मधून त्या स्वतंत्र दिग्दर्शिका म्हणून आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात करणार आहेत.

‘सुपर ३०’नंतर क्रितीची मोठी झेप

क्रिती शेट्टीसाठी हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे नवीन नाही. तिने २०१९ मध्ये हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ‘उप्पेना’ या तेलुगू चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. पुढे ‘श्याम सिंघा रॉय’, ‘बंगाराजू’, ‘कस्टडी’, ‘मनमे’ आणि ‘एआरएम’ यांसारख्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तेलुगूसह तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘हम तेरे प्यार में’मधून ती प्रथमच हिंदी चित्रपटात मुख्य नायिका म्हणून झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक एस. व्यास यांच्या एव्हीएस स्टुडिओजकडून ट्युडिप एंटरटेनमेंटच्या सहकार्याने केली जात आहे.

रोहित शेट्टींसाठी २०२७ ठरणार खास

दरम्यान, रोहित शेट्टी यांचा बहुप्रतीक्षित ‘गोलमाल ५’ आणि जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला ‘मारिया आयपीएस’ हे चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. त्यात आता ‘हम तेरे प्यार में’ची भर पडली आह. मात्र, या प्रेमकथेच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. एकीकडे क्रिती शेट्टीची बॉलिवूडमध्ये नवी सुरुवात, तर दुसरीकडे १७ वर्षांच्या मेहनतीनंतर विधी घोडगावकर यांचे दिग्दर्शनात पदार्पण, त्यामुळे ‘हम तेरे प्यार में’ ही प्रेमकथा दोघींसाठीही खास ठरणार आहे. आता रोहित शेट्टींच्या ॲक्शनच्या दुनियेतून समोर येणारी ही हळुवार प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनावर किती जादू करते, हेपाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read About: Kriti Sanon new horror movie – मॅडॉक फिल्म्ससोबत क्रिती सेनॉनचा नववा चित्रपट?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.