शहराच्या पाणीपुरवठ्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लातूर Latur Water Crisis : पावसाअभावी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४ टक्के जीवंत पाणीसाठा राहिला आहे. नोव्हेंबर महिन्यातच धरण मृत पातळी गाठत आहे. यामुळे आहे ते पाणी जपून वापरण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करा, प्रत्येक नळाला तोटी बसविणे बंधनकारक करा, शहरातील गळतीचे प्रमाण रोखा, पाणी सोडण्याच्या वेळा कमी करा, अशा सूचना करीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरासाठी स्वतंत्रपणे वॉर रुमची स्थापना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले.
शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी शनिवारी (दि.१४), महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी एकाही नळाला तोटी नसल्याचे पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४ टक्के जीवंत पाणीसाठा आहे. हे पाणी जास्तीत जास्त नोव्हेंबरपर्यंत पुरेल, त्यानंतर मृत पाण्यावर शहरवासियांना तहान भागवावी लागणार आहे. आहे ते पाणी जपून वापरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शहरातील एकाही नळाला तोटी दिसत नाही. मागील अनेक दिवसांपासून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु, तोटीअभावी लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
आता तोटी नसलेल्या नळधारकांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात करा, सांगून नागरिक ऐकत नाहीत, यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्याचप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्याचे काम महापालिकेने आधी करावे, अशा सूचना डॉ. बास्टेवाड यांनी केल्या. पुढे ते म्हणाले, शहरातील टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धरतीवर वॉर रुम स्थापन करावी, त्यातून टंचाईच्या सर्व समस्यांचे निवारण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बैठकीला महापालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश देवणीकर यांच्यासह अभियंता, पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.
२१० विंधन विहिरी बंदच
शहराला अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ३०१ विंधन विहिरी आहेत. त्यातील १ हजार ४७ बोअरवर विद्युत मोटारी आहेत. उर्वरित २५४ बोअरवर हातपंप आहेत. त्यातील १२४ हातपंप सुरू आहेत. तर तब्बल १३० हातपंप कायमचे बंद पडले आहेत. त्यातील काही पाण्याअभावी तर काही दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. विद्युत मोटारी बसविलेले ७९ बोअर कायमचे बंद आहेत. तर ९६८ बोअर सुरू असले तरी यातील बहुतेक बोअरचे पाणी गेले आहे. तीन विहिरींची स्वच्छता करून त्यातील पाणीही वापरण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. त्यात बांधकाम भवन परिसरातील एक विहीर, आर्वी भागातील एक विहीर व गोरक्षणजचळील एक अशा तीन विहिरींचा समावेश आहे.
मांजरा प्रकल्प तळाला
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात सध्या केवळ ४ टक्के जीवंत साठा शिल्लक आहे. हे पाणी केवळ नोव्हेंबरपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर मृत पातळीतील पाणी शहरवासियांना प्यावे लागणार आहे. या प्रकल्पाची मृत पातळी क्षमता ४७ दलघमी आहे. ते पाणी जूनअखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे.
भविष्यातील टंचाईवर मात कशी करणार?
शहराला जूनपर्यंत पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा आहे. त्यानंतर जूननंतर पाऊस होऊन प्रकल्पात पाणी येण्यास ऑगस्ट महिना उजाडतो. उर्वरित तीन महिने पाण्याची तहान कशी भागविणार, महापालिकेने तशा उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. जवळ असलेल्या तावरजा व निम्न तेरणा प्रकल्पातील शिल्लक पाणी टँकरने आर्वी जलशुध्दीकरण केंद्रात आणून त्याला शुध्द करून टँकरद्वारे देण्याचा महापालिकेचा विचार आहे. पंरतु, टँकरने आणलेले पाणी किती दिवस पुरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.