अंतराळातून परतलेल्या ‘स्टारशिप’ला हवेतच पकडले
केप कॅनाव्हरल : SpaceX Starship Makes History with Successful Mid-Air Catch – धनकुबेर उद्योजक इलॉन मस्क यांची अंतराळ कंपनी ‘स्पेसएक्स’ने इतिहास रचला आहे. या कंपनीचे सर्वात शक्तीशाली अंतराळयान ‘स्टारशिप’ शनिवारी यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले असून, प्रक्षेपण स्थळावरील महाकाय यांत्रिक हातांनी या यानाला हवेतच यशस्वीरीत्या झेलले. यानाने 22 तासांपूर्वी याच ठिकाणाहून अंतराळात उड्डाण केले होते. अंतराळातून परतलेल्या स्टारशिप यानाला हवेतच पकडण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
शुक्रवारी टेक्सासमधून प्रक्षेपण झाल्यानंतर काही वेळातच रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील बूस्टरचा स्फोट झाला. यामुळे एकाच उड्डाणात रॉकेटचे दोन्ही भाग सुरक्षित पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी थोडक्यात हुकली. चंद्र आणि मंगळ ग्रहावरील मोहिमांना वेग देण्यासाठी कंपनी हे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करत आहे. बूस्टरचे अवशेष मेक्सिकोच्या आखातात कोसळलेले असताना, दुसरीकडे स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले गोळीच्या आकाराचे हे यान प्रक्षेपण स्थळावर अगदी सरळ रेषेत खाली उतरले. अंतराळातून परतलेले स्पेसएक्स यांत्रिक हातांनी पकडण्याची घटना एखाद्या ‘सायन्स फिक्शन’ चित्रपटातील दृश्य वाटत होते. या प्रसंगी स्पेसएक्सचे समालोचक डॅन हुओट यांनी अत्यंत उत्साहाने ‘तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का? हे पहा! ते परत आले आहे!’ असे उद्गार काढले. त्यानंतर लगेचच इलॉन मस्क यांनी आपल्या टीमचे कौतुक केले.
अशी होती मोहीम
जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली अशा या 407 फूट (124 मीटर) उंच स्टारशिप रॉकेटने शुक्रवारी अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेजवळील स्पेसएक्सच्या ‘स्टारबेस’ प्रक्षेपण केंद्रावरून उड्डाण केले होते. पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर यानाने स्पेसएक्सचे 26 प्रगत ‘स्टारलिंक’ उपग्रह अंतराळात त्यांच्या निर्धारित ठिकाणी प्रक्षेपित केले. स्टारशिप सुमारे 265 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत होते. यावेळी स्टारलिंकच्या माध्यमातून यान आणि पृथ्वीच्या छायाचित्रांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर यानाने पृथ्वीच्या 14 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. यापूर्वीच्या चाचणीत केवळ एक ते दोनच प्रदक्षिणा पूर्ण झाल्या होत्या. 2023 पासून पूर्ण आकाराच्या स्टारशिपचे हे 15 वे उड्डाण होते.
यंदा बुस्टर पकडण्यात अपयश
शनिवारी अंतराळयान यशस्वीरीत्या पकडल्यामुळे स्टारशिपचा पूर्णपणे पुनर्वापर केला जाऊ शकतो, हे सिद्ध झाल्याचे स्पेसएक्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कमी खर्चात रॉकेटच्या भागांचा पुन्हा वापर करण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. शुक्रवारी बूस्टर परत मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असला, तरी कंपनीने यापूर्वी तीन वेळा बूस्टरला यशस्वीरीत्या हवेत पकडले आहे. यानाचे महत्त्वाचे उष्णतारोधक कवच आणि इतर सर्व प्रणालींनी उत्तम काम केल्याचे स्पेसएक्सने स्पष्ट केले. दरम्यान, बूस्टरच्या अपयशाबाबत माहिती देताना स्पेसएक्सच्या केट टायस यांनी सांगितले की, परतीच्या प्रवासात बूस्टरचे इंजिन वेळेपूर्वीच बंद पडले होते. बूस्टर निर्धारित स्थितीत नसल्याचे दिशा नियंत्रण प्रणालीच्या लक्षात येताच, प्रणालीने त्याला स्वयंचलितपणे समुद्राच्या दिशेने वळवून नष्ट केले. या तांत्रिक बिघाडाच्या कारणांचा अभियंते अद्याप तपास करत आहेत.
नासाच्या मोहिमा स्पेसएक्सवर अवलंबून
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’नेही या कामगिरीचे स्वागत केले आहे. या दशकाच्या अखेरीस ‘आर्टेमिस’ मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी आणि तिथे कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी नासाने स्पेसएक्सला कोट्यवधी डॉलर्स दिले आहेत. मात्र, मस्क यांची महत्त्वाकांक्षा याहून मोठी असून, त्यांना मंगळ ग्रहावर मानवी वसाहत वसवायची आहे. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमॅन यांनी हा अनुभव एखाद्या जादूसारखा होता, अशी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक सरत्या दिवसासोबत या मोहिमेवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आपण चंद्रावर अमेरिकेचा ध्वज फडकवण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचलो आहोत, असे आयझॅकमॅन म्हणाले.
Read More: China Shenlong Spaceplane – चीनच्या गुप्त अंतराळ विमानाचे सर्वात स्पष्ट छायाचित्र समोर
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.