शर्यत आणि शोषण!

शर्यत आणि शोषण! नेपाळमधील महापूर आणि भूस्खलनामुळे ओढवलेल्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीने जेव्हा चारशेहून अधिक लोकांचे प्राण एका क्षणात हिरावून घेतले आणि आश्वस्त जगण्याच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्हे उमटली, तेव्हा संपूर्ण मानवता काही काळासाठी अक्षरश: सुन्न झाली. या दुर्घटनेत अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत, नऊ जलविद्युत प्रकल्प भुईसपाट झाले आहेत, १९ पूल आणि सुमारे ४० किलोमीटर लांबीचे रस्ते नष्ट झाले आहेत. कोपलेल्या निसर्गाच्या एका फटक्यातच इमारतींची माती झाली आणि माणसाने अहंकाराने उभारलेले संसाराचे इमले पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. वातावरणातील बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती वाढत असल्याचे सांगितले जात असल्याने यापुढे कोणत्याही क्षणी कोठेही अशी अनपेक्षित संकटे घाला घालतील आणि क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाईल अशी भीती आता दूर राहिलेली नाही, त्यामुळेच जेव्हा जगणे अनिश्चित होते, तेव्हा तरी जीवनशैलीचा फेरविचार करणे गरजेचे होते. कारण अशा संकटाच्या क्षणी जगण्याचा मूळ अर्थ, निसर्गाचे सामर्थ्य आणि मानवी आयुष्याची नश्वरता स्पष्टपणे समोर येते. जीवन किती क्षणभंगुर आहे आणि संकटाच्या वेळी खरी गरज कशाची आहे याचे भान अशी संकटे आपल्याला देऊन जातात. याआधी काही जीवघेण्या संकटांनी अशा क्षणभंगुरतेची जाणीव करून दिली, तेव्हा तात्पुरत्या शहाणपणाचे झरे काहीकाळ जिंवत झाले. पण, दुर्दैवाने ती संकटे सरताच हे भानही तात्पुरते ठरले. संकट ओसरताच माणूस पुन्हा आपल्या जुन्या वळणावर येऊन दाखल झाला. नेपाळच्या या जीवघेण्या संकटाने आपल्याला जगण्याचे प्राधान्यक्रम बदलण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे; परंतु स्वार्थकारण, अर्थकारण, राजकारण आणि परस्पर संघर्षाच्या गर्तेत अडकलेला जगभरातील मानवसमाज या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत आहे.
जेव्हा निसर्ग रौद्ररूप दाखवतो तेव्हा जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत, देश किंवा सीमा या सर्व गोष्टी निरर्थक ठरतात. ढिगाऱ्याखाली अडकलेला माणूस फक्त श्वासाची आणि जगण्याची भीक मागत असतो. अशा प्रसंगी कोणतीही बँक शिल्लक, कोट्यवधींच्या मालमत्ता, आलिशान मोटारी, बंगले, राजकीय सत्ता किंवा सामाजिक प्रतिष्ठा त्याला वाचवू शकत नाही. अशा वेळी पाण्याचा एक घोट, अन्नाचा एक तुकडा आणि सुरक्षेचा एक हात हाच जगातील सर्वात मोठा खजिना वाटू लागतो. म्हणजेच संकटाच्या काळात मानवी जगण्याचे मूलभूत प्राधान्यक्रम स्पष्ट झालेले असतात. जीव वाचवणे, एकमेकांना सावरणे आणि बंधुभाव जपणे, हा संदेश मानवजातीला तोंडपाठ झालेला आहे. जगभरातील सर्व संस्कृतींचा हा संस्कारदेखील आहे. पण, असे संस्कार केवळ घोकंपट्टीने सिद्ध होत नसतात. जेव्हा कृतीची वेळ येते, तेव्हा अशा संस्कारांची कसोटी सुरू होते. नेपाळच्या संकटाने दिलेल्या क्षमभंगुरतेच्या संकेतानंतर जगभरातील मानवजातीच्या संस्कारांची ही कसोटी सुरू होणार आहे. आज संपूर्ण जग एका अस्वस्थ आणि स्वार्थी वळणावर उभे आहे. संकटाने दिलेल्या धड्यांमधून शिकण्याऐवजी माणूस स्वत:च विणलेल्या विनाशाच्या जाळ्यात अधिक खोलवर अडकत चालला आहे. आजचा जागतिक समाज अर्थकारणाच्या आणि स्वार्थकारणाच्या दावणीला बांधला गेला आहे. आर्थिक प्रगती आणि ‘जीडीपी’ने मोजल्या जाणाऱ्या विकासाच्या शर्यतीत माणसाने निसर्गाचे शोषण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. पर्यावरणाचा तोल ढळत आहे, हवामान बदलत आहे आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींंची तीव्रता वाढत आहे. तरीही केवळ नफा कमावणे हाच मानवजातीचा एकमेव उद्देश बनला आहे. निसर्गाशी जुळवून घेण्याऐवजी त्याच्यावर मात करण्याचा आंधळा अहंकार माणसाला विनाशाकडे घेऊन जात आहे. दुसरीकडे जगभरातील सत्तेच्या राजकारणाचा खेळ मानवी संवेदना सुन्न करत आहे. सत्तेच्या आणि संपत्तीच्या शर्यतीत, अर्थकारण व राजकारणाच्या स्पर्धेत आणि अनेक सामाजिक व सांस्कृतिक कारणांमुळे स्वास्थ्य आणि सलोखा हरवत चालला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले तरी माणसांची मने एकमेकांपासून दूर गेली आहेत. आपल्याच संस्कृतीचे किंवा विचारांचे वर्चस्व लादण्याच्या प्रयत्नातून ठिकठिकाणी हिंसेचे आणि द्वेषाचे वातावरण तयार होत आहे. निसर्गाने निर्माण केलेल्या आपत्ती आहेतच, पण मानवनिर्मित अशा कृत्रिम आपत्तींमुळे जीवन अधिकच दु:सह बनले आहे.
हे चित्र कधीतरी बदलावे, माणसाने माणसाशी माणसासम वागावे आणि माणुसकी सार्थ व्हावी अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत असते. पण, वर्षानुवर्षे या अपेक्षेकडे डोळे लावून राहिलेल्या समाजाच्या पदरी अपेक्षापूर्तीचे समाधान कधी पडणार हा प्रश्नच दिवसागणिक उग्र होत आहे. नेपाळमधील आपत्तीच्या ढिगाऱ्याखालून उमटणारा याच प्रश्नाचा आक्रोश सुन्न करतो आहे. जगण्याचा नेमका अर्थ काय, आपण कशासाठी जगत आहोत, भौतिक अवस्थेत ज्या स्वार्थासाठी माणुसकीदेखील पणाला लावली जाते, तो स्वार्थ आपल्याला किती काळ साथ देणार किंवा जगाचा निरोप घेण्याची वेळ येईल तेव्हा तो सोबत घेऊन जाणार, हा या आक्रोशाचा विदारक सूर आता सर्वत्र घुमतो आहे, त्यामुळे ज्या गोष्टी क्षणभंगुर आहेत, त्यांच्यासाठी सुरू असलेले संघर्ष संपविले पाहिजेत. जगण्याचा खरा अर्थ भौतिक सुखाच्या साठवणुकीत नसून मानवी मूल्यांच्या जपणुकीत आहे, याची जाणीव जागी करणाऱ्या संवेदनांची जपवणूक झाली पाहिजे. निसर्ग ही आपली मालमत्ता नसून आपण त्याचा एक छोटासा भाग आहोत याचेदेखील भान जागविणे हा आता जगण्याचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. नेपाळच्या संकटाने धोक्याची घंटा वाजवली आहे. निसर्गाने किंवा काळाने दिलेला हा इशारा अजूनही ऐकला नाही, तर मानवजातीचे भविष्य फारसे आशादायक नसेल एवढे नक्की!