Ad Advertisement Ad Advertisement

Magic Roundabouts : जादुई वाहतूक बेट – अभियांत्रिकी गणिती आविष्कार

Magic Roundabouts : ब्रिटनमध्ये अशा चुकांना माफी नसते, सहा वेळा अशा चुका झाल्याचे निदर्शनास आल्यास त्या चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना किमान पंधरा वर्षांसाठी वा कायमचा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे तिथला वाहनचालक या शिक्षेची धास्ती घेताना दिसतो. मुळात ब्रिटनमध्ये वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त करणे मोठे जिकिरीचे असते. ज्याच्याकडे वेळ आहे तो श्रीमंत, वेळ नाही तो गरीब. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक दर्शविणारे हे नऊ जादुई शब्द. तर्काच्या सर्व कसोट्या लावा आणि यावर बैजवार चिंतन करा, अंती तुम्हाला माझे म्हणणे सहज पटेल.

जेव्हा दोनपेक्षा अधिक रस्ते एका ठिकाणी एकवटतात तेव्हा सर्व बाजूंनी आलेल्या वाहनचालकांची आपापले वाहन पुढे दामटण्यासाठी अहमहमिका सुरू होते. अशावेळी वाहतूक दिवे (ट्रॅफिक सिग्नल) लावत मार्गदर्शनाची सोय केली जाते. बऱ्याचवेळा वाहनांची संख्या तुरळक असूनही केवळ वाहतूक दिव्यांच्या शिस्तीपोटी वाहतुकीस अनाठायी विलंब होतो. परंतु गर्दीच्या वेळी देखील काही चालकांकडे (ते वरील व्याख्येनुसार अत्यंत गरीब असल्याकारणाने त्यांच्याकडे) १०० सेकंद थांबण्यासाठी देखील वेळ नसतो. अशावेळी वाहतूक दिव्यांची शिस्त तोडून आपली गाडी वाहतूक नियमांच्याविरुद्ध घुसडण्याचे बेकायदेशीर कृत्य त्या उतावळ्या वाहनचालकाकडून होताना आपण पाहतो.

ब्रिटनमध्ये अशा चुकांना माफी नसते, सहा वेळा अशा चुका झाल्याचे निदर्शनास आल्यास त्या चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना किमान पंधरा वर्षांसाठी वा कायमचा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे तिथला वाहनचालक या शिक्षेची धास्ती घेताना दिसतो. मुळात ब्रिटनमध्ये वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त करणे मोठे जिकिरीचे असते.

वाहन चालवण्यासाठीच्या परवानाप्राप्तीच्या या कठीण निकषांमुळे असेल किंवा दुसरा कोणताही पर्याय नसेल म्हणूनही असेल कदाचित; परंतु ब्रिटनमधले वाहनचालक कमालीचे सोशीक भासतात किंबहुना संयम राखण्याशिवाय त्यांच्या हाती तसे काहीच नसते ना!
लंडन शहराभोवती एम-४० हा वर्तुळाकार मार्ग आहे. एम म्हणजे ‘मोटार वे’ म्हणजे अनेक भूभागांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग. या महामार्गावर वेगाच्या मर्यादा असतात, वेग कमी असेल तरी वाहनचालकाला दंड होतो. लंडन शहराभोवतीच्या या एम-४० महामार्गावर होणाऱ्या वाहनकोंडीत लोक दहा-बारा तास किमान अडकल्याचे प्रसंग घडलेले आहेत, म्हणून हा मार्ग म्हणजे ‘जगातील सर्वांत मोठा वाहनतळ’ अशी गमतीने टिंगल केली जाते.

परंतु वाहतूक दिवे किंवा पोलीस हे दोघे नसतील तरी अशा महाकाय जटिल चौकातील वाहतूक सुरळीत करता येऊ शकेल का? याचे उत्तर होय असे देता येते. तीदेखील कोणतीही वाहतूक कोंडी न होता वाहनांची बजबजपुरी, अनागोंदी न माजता हे कसे शक्य आहे? असे प्रश्न मनात येऊ शकतात. परंतु यावरील उपाय म्हणजे ‘वाहतूक बेट’ ज्याला इंग्रजीत ‘ट्रॅफिक आयलँड’ असे जगभर म्हणतात. ब्रिटनमध्ये मात्र यास ‘राउंड अबाउट’ असे म्हटले जाते.

या वाहतूक बेटाचा एकमेव नियम म्हणजे उजवीकडून येणाऱ्या वाहनाला प्राधान्य द्यायचे, म्हणजे पुढे जाऊ द्यायचे, आपले घोडे मध्ये घुसवायचे नाही म्हणजे नाही. जेव्हा उजवीकडून कोणतेही वाहन येत नाही तेव्हाच केवळ आपले वाहन डावीकडील रस्त्यावर वळवायचे. या वाहतूक बेटावरील वाहतूक डावीकडून उजवीकडे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार चालते. अगदी उजवीकडे वळायचे असले तरी डावीकडचे वळण घेत या वाहतूक बेटाच्या वर्तुळात शिरायचे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे उजवीकडे वळत वळत आपल्या मार्गावर मार्गस्थ व्हायचे. अशावेळी संयम राखत सर्वांना संधी मिळते, वाहतूक दिव्यांची खास सोय नसताना देखील वाहतूक अखंड सुरू राहते.
जेव्हा अनेक रस्ते एकत्र येतात तेव्हा अशी अनेक ‘वाहतूक बेटे’ त्या सर्व मार्गांना छेदून तयार केली जातात, अशावेळी त्यांना ‘जादूची वाहतूकबेटे’ तथा ब्रिटिश इंग्रजीत ‘मॅजिक राउंड-अबाउट’ असे संबोधले जाते.

ब्रिटनमध्ये अशी ‘जादूची वाहतूक बेटे’ पुढील चार शहरात आजही कार्यरत असलेली आढळतात.

१. स्वीडन या शहरात १९७२ मध्ये योजलेल्या एका मोठ्या वर्तुळाकार वाहतूक बेटाभोवती ५ छोटी वाहतूक बेटं वाहनांची वाहतूक अलगदपणे नियंत्रित करतात
२. हॅम्पस्टेड या छोटेखानी गावातील १९७३ मध्ये योजलेल्या एका मोठ्या वर्तुळाकार वाहतूक बेटाभोवती ६ छोटी वाहतूक बेटं अनेक रस्त्यांना एकत्र आणतात
३. पूर्व इंग्लंडमधल्या कोलचस्ट या गावात ५ छोटी वाहतूक बेटं एका वर्तुळाकार मोठ्या वाहतूक बेटात गुंफलेली दिसतात त्यास ‘कोलचस्ट ग्रीनस्टेड राउंड अबाउट’ असे संबोधले जाते
४. हाय विकम येथील ‘जायरेटरी राउंडबाउट’ म्हणजे एकप्रकारची जादूची भिंगरीच जणू.

‘जादूची वाहतूक बेटे’ ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे जाणारी असतात, तर काही त्याउलट म्हणजे उजवीकडून डावीकडे जाणारी.
वाहतूक बेटांना गुंफणारी ही शृंखला लंडनच्या हिथ्रो विमानतळाजवळच्या हॅटन क्रॉस इथे मात्र फसली की काय अशी शंका येते, कारण इथली वाहतूक आता स्वयंचलित वाहतूक दिव्यांनीच केवळ नियंत्रित होते.

स्वयंशिस्तीचे काटेकोर पालन या वाहतूक बेटांना मानवनियंत्रणविरहित व बिनखर्चाचे करतात. अशाच क्लृप्त्या भारतातील महामार्गावर व शहरातील अतिगर्दीच्या चौकात वापरल्यास त्या केवळ वेळेचीच बचत न होता, मनस्तापाला देखील दूर ठेवणाऱ्या ठरतात. ‘वाहन चालवणे’ आनंदाचे परिधान व्हायला हवे, तरच त्यातून भीषण अपघात टळतील आणि जीवित तसेच वित्तहानीपासून सर्वांना दूर ठेवता येईल.
गर्दीच्या चौकातील भुयारी मार्ग ज्याला ‘ग्रेड सेपरेटर’ असेही संबोधले जाते, त्यांचा उपयोग देखील वाहतुकीस सुखकर ठरतो.

देवेंद्र रमेश राक्षे
संपर्क : ८३०८३०२४००

Read About : India Poverty Reduction : गरिबी कमी झाली; जीवनमान बदलले का?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.