उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : Maharashtra CET 2027 Exam Schedule महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. एकूण २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जानेवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जातील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा
राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेण्यात येत आहेत. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन आता आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून दुसरी सीईटी ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण असतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमची प्रथमच सीईटी
शासनाच्या निर्देशानुसार आता पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेण्यात येणार आहे. यामध्ये पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा होणार आहेत. पीजीडीएम व पीजीसीएम यांची सीईटी ही एमबीए सीईटीबरोबरच घेतली जाणार आहे.
एकात्मिक बीएड-एमएड सीईटी बंद
तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एमपीएड व एमएड व बीएड या परीक्षा जूनमध्ये घेण्यात याव्यात अशी विद्यार्थी व संस्था यांची मागणी होती. त्यामुळे या परीक्षा यावर्षी जूनमध्ये घेण्यात येत आहेत.
दोन सीईटीच्या संभाव्य तारखा
एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी २०२७; दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७.
पाच वर्षीय एलएलबी : पहिली परीक्षा २८ ते २९ मार्च; दुसरी परीक्षा २४ मे २०२७.
पीसीबी समूह : पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल; दुसरी परीक्षा ६ ते ८ मे २०२७.
पीसीएम समूह : पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल; दुसरी परीक्षा १० ते १५ मे २०२७.
बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल; दुसरी परीक्षा २७ ते २८ मे २०२७.
अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटीचे संभाव्य वेळापत्रक
एमएचएमसीटी – २४ मार्च, एमसीए – २७ मार्च, एएसी (कला शिक्षण) – ११ एप्रिल, बी.डिझाईन – १८ एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी – ४ व ५ मे, डीपीएन/पीएचएन – १८ मे, नर्सिंग – १८ व १९ मे, जीएनएम नर्सिंग – २१ व २२ मे, एमपीएड – ५ जून, एमएड – ६ जून, तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ दरम्यान होणार आहेत.
Read About : No Age Limit for Law Admissions – विधि अभ्यासक्रमांसाठीची वयोमर्यादा रद्द
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.