प्रोटीन पावडर आणि हेल्थ सप्लिमेंट्सच्या चुकीच्या जाहिराती करणारे जिम, मेडिकल स्टोअर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स FDA च्या रडारवर; 17 ठिकाणी तपासणी करून 1.38 कोटींचा साठा जप्त.
Maharashtra FDA Supplement Rules : जिममध्ये प्रोटीन पावडर वापरता? किंवा सोशल मीडियावर हेल्थ सप्लिमेंट्सची जाहिरात करता? मग सावधान! कारण आता हेल्थ सप्लिमेंट्सबाबत चुकीचे दावे करणाऱ्या कंपन्या, विक्रेते आणि इन्फ्लुएन्सर्सवरही कारवाई होऊ शकते. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हेल्थ सप्लिमेंट्स, प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादनं आणि इतर न्यूट्रास्युटिकल्सच्या विक्री आणि जाहिरातींबाबत कडक नियम लागू केले आहेत. विशेष म्हणजे, आता केवळ उत्पादक आणि कंपन्याच नाही, तर जिम, फिटनेस सेंटर, मेडिकल स्टोअर्स, फार्मसी आणि ऑनलाइन विक्रेतेही FDA च्या रडारवर असणार आहेत.
हेल्थ सप्लिमेंट्सच्या जाहिरातींवर FDA ची नजर
सध्या तरुणांमध्ये बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चांगली बॉडी बनवण्यासाठी अनेकजण प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन्स, वजन कमी करणाऱ्या गोळ्या आणि वेगवेगळ्या हर्बल सप्लिमेंट्सचा वापर करतात.
मात्र, याच मार्केटमध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचं FDA च्या निदर्शनास आलं आहे. काही प्रोडक्ट्समध्ये जे घटक असल्याचा दावा केला जातो, ते प्रत्यक्षात नसण्याची शक्यता असते. तर काही उत्पादनं आजार बरा करण्याचा किंवा वजन झटपट कमी करण्याचा दावा करतात.
FDA ने स्पष्ट केलं आहे की हेल्थ सप्लिमेंट म्हणजे औषध नाही. त्यामुळे एखादं सप्लिमेंट डायबिटीज, हृदयरोग किंवा इतर आजार बरा करतं, असा दावा करता येणार नाही.
जिम आणि मेडिकल स्टोअर्ससाठी FSSAI लायसन्स आवश्यक
नव्या नियमांनुसार, हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री करणाऱ्या जिम, फिटनेस सेंटर, मेडिकल स्टोअर्स आणि फार्मसीकडे संबंधित FSSAI फूड लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.
एखाद्या व्यवसायाकडे इतर कायद्यांनुसार परवाना असला, तरी हेल्थ सप्लिमेंट्सची विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला FSSAI परवाना घेणं बंधनकारक आहे.
या नियमांचा विस्तार उत्पादक, आयातदार, वितरक, गोदामं, किरकोळ विक्रेते आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपर्यंत करण्यात आला आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही नियम लागू
आज अनेक फिटनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर प्रोटीन पावडर, वजन कमी करणारी उत्पादनं आणि हर्बल सप्लिमेंट्सची जाहिरात करतात. मात्र, जाहिरात करताना चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे केल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
एखादं प्रोडक्ट डॉक्टरांनी किंवा न्यूट्रिशनिस्टने रेकमेंड केलं आहे, ते आजार बरा करतं किंवा विशिष्ट आरोग्य समस्या दूर करतं, असे दिशाभूल करणारे दावे करता येणार नाहीत. डॉक्टरांचे फोटो किंवा वैद्यकीय शिफारशीचा भास निर्माण करणाऱ्या जाहिरातींवरही निर्बंध आहेत.
अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आवश्यक FSSAI परवान्याशिवाय खाद्य व्यवसाय चालवल्यासही स्वतंत्रपणे दंडात्मक कारवाई होऊ शकते.
प्रोडक्टच्या पॅकेटवर कोणती माहिती असणं आवश्यक?
हेल्थ सप्लिमेंट्सच्या पॅकेटवर त्यातील घटक, वापरण्याची पद्धत, डोस, आवश्यक सूचना आणि सुरक्षिततेबाबतची माहिती स्पष्टपणे नमूद असणं गरजेचं आहे.
लागू असलेल्या उत्पादनांवर ‘NOT FOR MEDICINAL USE’ असा इशाराही असणं आवश्यक आहे. उत्पादकांनी नियमांनुसारच घटकांचा वापर करावा आणि उत्पादनाच्या लेबलवर आवश्यक माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
FDA ची मोठी कारवाई; 1.38 कोटींचा साठा जप्त
या नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर FDA ने 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील सहा विभागांमध्ये 17 ठिकाणी तपासणी केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 38 लाख 95 हजार 852 रुपये किमतीचा हेल्थ सप्लिमेंट्सचा साठा जप्त करण्यात आला.
तपासणीदरम्यान काही उत्पादनांमध्ये FSSAI कडून मंजुरी न मिळालेल्या घटकांचा वापर झाल्याचं आढळलं. यामध्ये Magnesium Acetyl Taurate आणि Nicotinamide Mononucleotide या घटकांचा समावेश असल्याची माहिती FDA ने दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
स्टेरॉइड्स आणि हार्मोन्सचीही तपासणी होणार
यापुढे स्पोर्ट्स न्यूट्रिशन, वजन कमी करणारी उत्पादनं, हर्बल सप्लिमेंट्स, आयात केलेली उत्पादनं आणि ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्सची विशेष तपासणी केली जाणार आहे.
काही सप्लिमेंट्समध्ये लपवून स्टेरॉइड्स, हार्मोन्स किंवा औषधांसारखे घटक वापरले आहेत का, याचीही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे सप्लिमेंट्सच्या उत्पादनापासून ते विक्री आणि जाहिरातीपर्यंत संपूर्ण साखळी FDA च्या निरीक्षणाखाली असणार आहे.
सप्लिमेंट खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा
सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. कोणतंही हेल्थ सप्लिमेंट खरेदी करण्याआधी त्याचं पॅकेट, त्यावरील घटक, FSSAI लायसन्स आणि वापरण्याच्या सूचना तपासा. गरज असल्यास डॉक्टर किंवा पात्र आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
कारण बॉडी बनवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालणं परवडणारं नाही!
Read About : Gold Adulteration in India : 22 कॅरेट सोन्यात भेसळ? खरेदी करण्यापूर्वी हे नक्की तपासा!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.