Ad Advertisement Ad Advertisement

Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!

डिसेंबर परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
दररोज दोन सत्रांत होणार संगणक आधारित परीक्षा

छत्रपती संभाजीनगर : Ugc Net December 2026 Exam – राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) यूजीसी नेट डिसेंबर २०२६ परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर आणि त्यानंतर २१ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणक आधारित पद्धतीने (सीबीटी) ही परीक्षा घेतली जाणार असून, दररोज दोन सत्रांमध्ये परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना आता आपल्या विषयाच्या परीक्षेची तारीख आणि सत्र निश्चित झाले आहे.

एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, परीक्षेचे पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या विषयानुसार परीक्षेची तारीख, सत्र आणि वेळ यांची नोंद करून ठेवावी. परीक्षेसंदर्भातील कोणताही संभ्रम टाळण्यासाठी अधिकृत वेळापत्रकाचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यूजीसी नेट परीक्षेचा पहिला दिवस १४ डिसेंबर असून, सकाळच्या सत्रात इतिहास, पाली, प्राकृत, बंगाली, तुलनात्मक साहित्य, संगीत, लोकप्रशासन, शिक्षण, समाजकार्य आणि मल्याळम या विषयांची परीक्षा होणार आहे.

त्याच दिवशी दुपारच्या सत्रात संगणक शास्त्र व अनुप्रयोग, पर्शियन, रशियन, गृहविज्ञान, लोकसंख्या अभ्यास, मानसशास्त्र, मैथिली, अरेबिक आणि व्यवस्थापन या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात उर्दू, गुन्हेशास्त्र, संस्कृत पारंपरिक विषय, आदिवासी भाषा व साहित्य, लोकसाहित्य, राज्यशास्त्र, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, जपानी, डोगरी, राजस्थानी आणि इंग्रजी या विषयांची परीक्षा घेतली जाईल. दुपारच्या सत्रात शारीरिक शिक्षण, परफॉर्मिंग आर्ट, आयुर्वेद जीवशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, वाणिज्य, संरक्षण अभ्यास, भारतीय संस्कृती, बौद्ध-जैन-गांधीवादी अभ्यास, भाषाशास्त्र आणि व्हिज्युअल आर्ट या विषयांच्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे.

मराठी विषयाची परीक्षा १६ डिसेंबरला

१६ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात चिनी, कोकणी, स्पॅनिश आणि काश्मिरी या विषयांची परीक्षा होईल. तर दुपारच्या सत्रात म्युझिओलॉजी, पंजाबी, तमिळ, भूगोल आणि मराठी या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे मराठी विषयातून यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी १६ डिसेंबरच्या दुपारच्या सत्राची विशेष नोंद घ्यावी. १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात हिंदी, अरब संस्कृती व इस्लामिक अभ्यास, भारतीय ज्ञान प्रणाली, मणिपुरी, कन्नड, जर्मन, सिंधी, फ्रेंच, अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हिंदू अभ्यास आणि मानववंशशास्त्र या विषयांची परीक्षा होईल. याच दिवशी दुपारच्या सत्रात कामगार कल्याण, संथाली, जनसंवाद व पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक सायन्स, महिला अभ्यास, कायदा, तेलुगू, न्यायवैद्यकशास्त्र, नेपाळी, ग्रंथालय विज्ञान, तत्त्वज्ञान, आसामी, समाजशास्त्र, योग आणि पर्यटन प्रशासन या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे.

२१ डिसेंबरला शेवटचे सत्र

परीक्षेचा शेवटचा दिवस २१ डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळच्या सत्रात बोडो, गुजराती, संस्कृत, आंतरराष्ट्रीय संबंध आणि मानवी हक्क या विषयांची परीक्षा होणार आहे. तर दुपारच्या सत्रात प्रौढ शिक्षण, पुरातत्त्वशास्त्र, उडिया, सामाजिक औषधशास्त्र, सांख्यिकी आणि वनीकरण या विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील.

परीक्षा केंद्राचे शहर २१ दिवस आधी समजणार

दरम्यान, उमेदवारांना परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असणार आहे, याची माहिती देणारी सिटी इंटिमेशन स्लिप परीक्षेच्या २१ दिवस आधी एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सूचनेच्या आधारे उमेदवारांना परीक्षा केंद्राचे शहर समजू शकेल. मात्र, ही सूचना म्हणजे प्रवेशपत्र नसून प्रवेशपत्र स्वतंत्रपणे जारी केले जाईल. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परीक्षेच्या तयारीसोबतच वेळापत्रक आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या तारखा, सत्र, प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र आणि इतर नियमांमध्ये काही बदल किंवा नवीन सूचना जाहीर झाल्यास त्याची माहिती एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

Read About : Assistant Professor Recruitment – अनुदानित महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक भरतीसाठी नवे नियम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.