Mangalsutra : भारतीय उपखंडातील सुमारे शंभर कोटी महिलांमध्ये पंचावन्न कोटी विवाहित महिला मंगळसूत्र विवाहवेदीवर प्राप्त झालेले सौभाग्यलेणं म्हणून स्वीकारतात, तेव्हा स्त्री-पुरुषांच्या नातेबंधाला पवित्र सूत्राने बांधल्याची पवित्र भावना त्या दोघांच्या आयुष्यातील केवळ एक खाजगी वैयक्तिक अशी बाब म्हणून रहात नाही, तर त्याला सामाजिक सुरक्षिततेचे संदर्भ प्राप्त होतात.
२००५ मधील हा प्रसंग. मी तेव्हा इंग्लंडच्या पूर्वेकडील एका गावात नोकरीनिमित्त वास्तव्य करत होतो. भारतातून बिजू नावाचा एक तरुण केवळ एका महिन्यासाठी माझ्यासोबत कामाकरता आला होता. त्याची राहण्याची सोयदेखील मी माझ्याच घरात केलेली होती. त्या काळात माझी पत्नी भारतात होती. शुक्रवार हा आठवड्याचा शेवटचा कामकरी दिवस. त्या संध्याकाळपासून पुढचे दोन दिवस एकाकीपणामुळे मला खायला उठत असत. अशा वेळी माझा एकाकीपणा घलवावा म्हणून माझे ब्रिटिश सहकारी मला त्यांच्या घरी रहायला बोलवत. बिजूला याचे खूप नवल वाटे. एकदा तो माझ्या एका ब्रिटिश मित्राच्या घरी माझ्यासोबत आला होता. माझ्या नकळत त्याने पाठीवरच्या पिशवीत नुकत्याच पार पडलेल्या त्याच्या बहिणीच्या लग्नाचा अल्बम सोबत घेतला. माझ्या ब्रिटिश मित्राच्या घरी त्याला व त्याच्या बायकोला तो फोटोंचा अल्बम दाखवू लागला.
बिजू ख्रिस्ती पंथाचा. माझे मित्र दाम्पत्य तर मूळ युरोपियन ब्रिटिश ख्रिस्ती पंथाचे. भारतातील ख्रिस्ती लग्न कसे साजरे होतात त्याबद्दल त्यांनादेखील कुतूहल होते. त्याआधी हिंदू पद्धतीने झालेले विवाहसोहळे त्यांनी पाहिलेले होते. बिजूच्या बहिणीच्या लग्नाचा अल्बम पाहताना एका फोटोजवळ मित्राची बायको थांबली व तिने विचारले की नवरा मुलगा बायकोच्या गळ्यात हा पांढरा दोरा कशाला घालतो आहे? बिजूने सांगितले की, ‘हा तर थ्रेडिंग सेरेमनी.’ माझ्या मित्राला व त्याच्या बायकोला वाटले की हा कुठला ख्रिस्ती रिवाज? बिजू मात्र ठामपणे तेच तेच उच्चारत होता. ते दोघेजण माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
मला हा गोंधळ लगेच समजला. त्याला ‘मंगळसूत्र’ म्हणतात असे मी माझ्या ब्रिटिश मित्राच्या बायकोला सांगितले. त्यानंतर ‘मंगळसूत्र’ नावाची पद्धत सर्व भारतीय उपखंडात म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका अगदी अफगाणिस्तान, मालदिव, ब्रम्हदेशात देखील कशी असते याचे सविस्तर वर्णन मी त्यांना सांगू लागलो. ही माहिती भारतात जन्म गेलेल्या ख्रिस्ती वंशीय बिजूलादेखील माहीत नव्हती आणि ‘थ्रेडिंग सेरेमनी’ असा काही प्रकार मूळ ख्रिस्ती पंथात मुळी नसतोच हे समजून घेताना त्याला कठीण मात्र जात होते.
भारतीय उपखंडातील सर्व विवाहित महिला ‘मंगळसूत्र’ या धारणेचा दागिना परिधान करतात. हिमाचल प्रदेशात तर तो लाल रंगाच्या मण्यांचा केलेला आढळतो. अगदी पाकिस्तानी मुस्लिम महिला झुमर, पासा, गुलूबंद या नावाने गळ्यात, केसातील भांगात विवाहलेणं म्हणून परिधान करतात. भारतातील मुस्लिम महिला हिंदू पद्धतीच्या रूपातले थेट मंगळसूत्रच परिधान करतात. भारतातील ख्रिस्ती महिलादेखील आपण विवाहित असल्याचे प्रतीक म्हणून सरळसरळ मंगळसूत्र गळ्यात मिरवतात. ख्रिस्ती लग्नात मात्र केवळ रीत म्हणून गळ्यात अडकवलेला हा पांढरा दोरा पुढे मंगळसूत्राचे रूप घेऊन विवाहितेच्या सौंदर्यात भर घालतो.
भारतीय उपखंडातील सुमारे शंभर कोटी महिलांमध्ये पंचावन्न कोटी विवाहित महिला मंगळसूत्र विवाहवेदीवर प्राप्त झालेले सौभाग्यलेणं म्हणून स्वीकारतात, तेव्हा स्त्री-पुरुषांच्या नातेबंधाला पवित्र सूत्राने बांधल्याची पवित्र भावना त्या दोघांच्या आयुष्यातील केवळ एक खाजगी वैयक्तिक अशी बाब म्हणून रहात नाही तर त्याला सामाजिक सुरक्षिततेचे संदर्भ प्राप्त होतात, तेव्हा मात्र या विषयाला सामाजिक पातळीवरचे गांभीर्य प्राप्त होते.
मंगळसूत्र याच शीर्षकाची चित्रित केलेली एक कथा पाहिल्याचे मला आठवते आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक कुमारिका तिच्या मागे लागलेल्या गुंडांचा ससेमिरा टाळला जावा म्हणून गळ्यात खोटे मंगळसूत्र घालून फिरते. मंगळसूत्राच्या धाकाने तिची गुंडांच्या दहशतीपासून मुक्तता होते, परंतु त्यादरम्यान ती विवाहित असल्याच्या वंदता पसरतात व गळ्यात सुरक्षेसाठी घातलेले खोटे मंगळसूत्र तिचे लग्न ठरताना अडथळा ठरते.
पुरुषी नजरेतील विखार टिपण्याची कला एक सहावे इंद्रिय (सिक्स्थ सेन्स) म्हणून महिलांना लाभलेले असते असे खुद्द महिलादेखील मान्य करतात. अशा वेळी केवळ नजरेच्या धाकानेदेखील कोणत्याही परपुरुषाला त्या महिलेचा गैरफायदा घेण्यापासून रोखले जाऊ शकते. परंतु, निर्ढावलेल्या वा गुंड प्रवृत्तीच्या पुरुषी मानसिकतेला त्याच पुरुषी प्रवृत्तीने न बोलता उत्तर देण्याचे काम त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र करते. ती महिला एकाकी नाही, तिच्या संरक्षणार्थ तिचा जिवलग पाठीराखा नवरा अदृश्यपणे तिच्या पाठीशी सदैव आहे, हा स्पष्ट संदेश देण्याचे भक्कम काम गळ्यातील मंगळसूत्र जेव्हा करते, तेव्हा ते परिधान करण्यासाठी महिलांना हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती किंवा अन्य कोणत्याही पंथाचा अडथळा मध्ये येत नाही. मंगळसूत्र परिधान करण्याचा मार्ग भारतीय उपखंडातील प्रत्येक महिला त्याकरिता अनुसरते.
माझे हे सर्व विवेचन आणि मंगळसूत्र या विषयावरील सामाजिक सुरक्षेचे भान विशद करणारा एकंदर ऊहापोह माझ्या ब्रिटिश मित्राच्या पत्नीला विचाराधीन करता झाला. भारतीय उपखंडातील महिलांनी अवलंबिलेला मंगळसूत्राचा पर्याय तिला उत्तम वाटू लागला. युरोपियन बायकांनीदेखील मंगळसूत्राचा असा वापर करायला हवा असे तिला वाटू लागले. ती तिच्या मैत्रिणीशी या विषयावर नक्की बोलणार असे तिने मला स्पष्ट सांगितले.
मुळात ब्रिटन, युरोपमधल्या प्रगत देशांतील महिलांना अशा कुबड्यांची गरजच काय असे मी तिला विचारले, तेव्हा ब्रिटन, अमेरिका तसेच युरोप, रशियातदेखील महिला अत्याचारांचे प्रमाण मोठे असल्याची आकडेवारीच तिने मला दाखवली. या प्रसंगाला आज २१ वर्ष उलटून गेली, परंतु युरोपमधल्या महिलांच्या सामाजिक सुरक्षेची अवस्था अजूनही बिकट होत चालली आहे असे आकडेवारीच सिद्ध करते. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ब्रिटनमधल्या इंग्लंड व वेल्श या दोन राज्यांत महिलांवरील बलात्काराच्या सुमारे चौऱ्याहत्तर हजार सातशे (७४,७००) घटना पोलीस ठाण्यात नोंदल्या गेल्या. याच कालावधीदरम्यान बलात्कार तथा विनयभंगाच्या घडलेल्या सुमारे साडे सात लाख घटनांची नोंददेखील पोलिसांकडे करण्यात महिलांना सुरक्षित वाटले नसावे किंवा नोंद करूनदेखील पोलीस काही करत नाही असे वाटले असावे.
सोळावं वरिस धोक्याचं हे सांगणाऱ्या वयात प्रत्येक चार मुलींच्या पाठी किमान एक मुलगी आज ब्रिटनमध्ये बलात्काराची किंवा विनयभंगाची बळी ठरते, या आकडेवारीची उजळणी ‘मंगळसूत्र’ या शब्दाच्या निमित्ताने आठवलेल्या जुन्या प्रसंगाने करून दिली मात्र.
(क्रमश:…)
देवेंद्र रमेश राक्षे
संपर्क : ८३०८३०२४००

You need an account to post comments.