Ad Advertisement Ad Advertisement

Aundha Nagnath Fire – औंढा नागनाथ येथे भीषण आग; 6 दुकाने जळून खाक

अग्निशमन दलाच्या २ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

औंढा नागनाथ : Aundha Nagnath Fire शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि.३०) सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे मानले जात आहे. सुदैवाने, नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळी ७ वाजता मोबाईल विक्री व दुरुस्ती, बॅटरी दुरुस्ती आणि इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानातून अचानक धूर निघताना हॉटेलचालकांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख, उपनिरीक्षक शेख खुद्दूस यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून वाहतूक बंद केली आणि हिंगोली व औंढा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी ९ वाजता आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीश बेदरे, अब्दुल कदीर आणि रामभाऊ साळुंके यांच्या दुकानांतील साहित्य जळून खाक झाले.

अग्निशमन गाडीला उशिर; नागरिकांचा संताप

घटनेदरम्यान औंढा नगरपंचायतीची अग्निशामक गाडी उशिराने पोहोचल्याने आणि त्यात पाणीच नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. आग आटोक्यात आल्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास संतप्त जमावाने नगरपंचायतीसमोर जमून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आमदार संतोष बांगर यांच्याकडून मदत

घटनेची माहिती मिळताच आ.संतोष बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त दुकानदारांची पाहणी केली. शिवसेनेच्या वतीने त्यांनी प्रत्येक बाधित दुकानदाराला ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ३ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देत दिलासा दिला. तसेच महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी आशा गीते, तलाठी गजानन गुंजकर आणि मुख्याधिकारी धनंजय उपलवाड यांनी नुकसानीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख, नगरसेवक साहेबराव देशमुख, अज्जू इनामदार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. शासकीय पातळीवरूनही तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त दुकानदारांकडून केली जात आहे.

Read About : Mumbai Bhuleshwar Fire : इमिटेशन ज्वेलरी दुकानाला भीषण आग
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.