वीज साठवणूक क्षमता कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण गाठला टप्पा
छत्रपती संभाजीनगर : Battery Storage First In India महावितरणने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिमच्या (बीईएसएस) माध्यमातून १००० मेगावॅट अवर वीज साठवणूक क्षमता कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. देशातील वीज वितरण कंपन्यांमध्ये विकेंद्रित स्वरूपात ग्रीडशी जोडलेली एवढ्या क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था सुरू करणारी महावितरण ही पहिली कंपनी ठरल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापक संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा तसेच ग्रीडद्वारे उपलब्ध होणारी स्वस्त सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून सायंकाळच्या वाढीव वीजमागणीच्या काळात वापरण्याची व्यवस्था महावितरणने विकसित केली आहे. त्यामुळे सौरऊर्जेचा अधिक प्रभावी वापर करणे आणि ग्राहकांना आवश्यक त्या वेळी वीज उपलब्ध करून देणे शक्य होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कृषीपंपांना दिवसा पुरवली जाते. अतिरिक्त वीज बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी वापरण्यामुळे वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होत आहे. सौरऊर्जा उपलब्ध नसलेल्या सायंकाळच्या वेळेत वीजमागणी वाढते. अशा वेळी बाजारातून तुलनेने महागडी वीज खरेदी करण्याची गरज कमी करण्यासाठी बॅटरी साठवणूक व्यवस्था उपयुक्त ठरू शकते. सध्याच्या उष्ण हवामानामुळे वाढलेल्या वीजमागणीच्या काळात या प्रकल्पाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
५० ठिकाणी बॅटरी प्रकल्प सुरू
महावितरणने राज्यात एकूण ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प सुरू केले आहेत. सध्या ५०० मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी व्यवस्थेतून दोन तास वीजपुरवठा करता येत असल्याने एकूण १००० मेगावॅट अवर ऊर्जा उपलब्ध होते. महावितरणची एकूण ७५० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था उभारण्याची योजना असून, त्यातून दोन तासांसाठी १५०० मेगावॅट अवर ऊर्जा उपलब्ध होण्याचे नियोजन आहे. त्यापैकी १००० मेगावॅट अवर क्षमतेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ४००० मेगावॅट अवर क्षमतेचे अन्य प्रकल्पही प्रगतीपथावर आहेत.
स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिममुळे सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय स्रोतांतून निर्माण झालेली वीज साठवून गरजेच्या वेळी वापरता येते. त्यामुळे सौरऊर्जेचा अधिकाधिक उपयोग, वीजपुरवठ्याचे सुधारित नियोजन आणि वीजखरेदीचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी उन्हाळ्यात वीजमागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, बॅटरी साठवणूक प्रकल्प राज्याच्या वीज व्यवस्थेला अतिरिक्त आधार देऊ शकतात.
Read About: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.