महापौरांचे आदेश : स्पष्ट बहुमत असलेल्या महायुतीचा एमआयएमला पहिला दणका
छत्रपती संभाजीनगर : Mim Corporator Suspension CSN : जाधववाडीतील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वर्ग २ च्या जागेवरील अवैध प्लॉटिंगचा मुद्दा शुक्रवारी (दि.१३) मनपाच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अतिक्रमण व अवैध बांधकामापर्यंत आली, यावर झालेल्या चर्चेदरम्यान एमआयएम नगरसेवक मो.असरार मो. अकबर यांनी तावातावाने मुद्दे मांडले, त्यांना महापौरांनी तीनवेळा समज दिल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात फरक पडला नाही, अखेर महापौरांनी त्यांचे निलंबन करत, त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्याविरोधात एमआयएमचे सर्व नगरसेवकांनी महापौरांसमोर जमा होवून निषेध केला. भाजप नगरसेवकही पुढे सरसावले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. सुमारे पाऊण तास हा गोंधळ चालला. शेवटी एमआयएमचे सर्व नगरसेवक सभागृहाबाहेर पडले, व सभा पुन्हा शांततेत सुरू झाली. विशेष म्हणजे मागील दहा महिन्यापासून एमआयएमला सांभाळून घेणाऱ्या महापौर समीर राजूरकर यांनी अखेर आपल्या अधिकाराचा वापर करत, एमआयएमला दणका दिला.
विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी श्रीराम मंदिराच्या अवैध प्लॉटिंगचा मुद्दा उपस्थित करत, कारवाई व गुन्हे दाखल का होत नाहीत, यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी मो. असरार यांनीही जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. प्रशासनाला अनेक पत्र देऊनही माहिती दिली जात नसल्याचे ते म्हणाले. यावरून चर्चा चांगलीच तापली, अखेर महापौर राजूरकर यांनी मो. असरार यांना एक दिवसांसाठी निलंबित करत असल्याचे आदेश दिले. महायुतीच्या नगरसेवकांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. तर एमआयएम नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर जमा झाले, काहींनी राजदंड पळविण्याचाही प्रयत्न केला. महायुतीच्या नगरसेवकांनी वंदे मातरम्, जय श्रीराम अशा घोषणा सुरू केल्या. तर दादागिरी नही चलेगी… गुंडागर्दी नही चलेगी, नारा ए तकबीर अल्ला हू अकबर म्हणत एमआयएम नगरसेवकांनीही घोषणा सुरू केल्या. निलंबित नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश होताच सुरक्षारक्षक सरसावले, यावेळी रेटारेटी सुरू झाली. महापौर राजूरकर यांनी निलंबित सदस्याने बाहेर जावे, असे तिनदा आदेश दिले. नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनीही निलंबनासंदर्भातील नियमांची माहिती सभागृहाला देत, आदेश पाळण्याची सूचना केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली. अखेर विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांच्या नेतृत्वात सर्व एमआयएम नगरसेवकांनी सभागृह सोडले. तर कोरम पूर्ण असल्याचे सांगत महापौरांनी सभेचे कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. एमआयएम नगरसेवकांनी सभागृहाबाहेर जावून महापौरांविरोधात घोषणाबाजी केली. अखेर दुपारी ३:१० वाजता मो. असरार वगळता सर्वजण पुन्हा सभागृहात आले., व कामकाजात सहभागी झाले.
अपात्रतेची सर्व प्रकरणे काढा: जंजाळ
निलंबन आदेश देत कारवाई करत, एक चांगला संदेश महापौरांनी दिल्याचे म्हणत उप महापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापौरांचे अभिनंदन केले. तसेच सभागृहाची गनिमा राखलीच पाहिजे. आम्ही ३६ आहोत, म्हणून दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पिठासीन अधिकाऱ्यांचे आदेश पाळले गेलेच पाहिजे. एक नगरसेवक आक्रमण होऊन मुद्दे मांडतो, त्याचे बॅकग्राऊंड तपासले पाहिजे. आयुक्तांकडे यांचे (एमआयएम नगरसेवक अपात्रतेची प्रकरणे) अनेक विषय प्रलंबित असून, त्यावर निर्णय घ्यावे, सर्व प्रलंबित विषय संपवून टाका, अशी सूचनाही जंजाळ यांनी आयुक्तांना केली.
शिंदे सेनेचे नगरसेवक बसूनच
भाजप आणि एमआयएम नगरसेवकांचा सभागृहातच गोंधळ सुरू असताना, शिवसेनेचे (शिंदेसेना) गटनेते किशोर नांगरे, ऋषीकेश जैस्वाल दोघेच भाजप नगरसेवकांसोबत उभे राहिले. इतर नगगरसेवक मात्र जागेवरच बसून होते. निलंबित नगरसेवकाला बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना ताकद देण्यात भाजप नगरसेवक कमी पडल्याचे यावेळी दिसून आले.
गैरवर्तवणूक खपवून घेणार नाही
सभागृहाची गनिमा राखली पाहिजे. सदस्यांची गैरवर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही. आपले मुद्दे शांततेत मांडले पाहिजे. त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी ऐकले नाही. पिठासीन अधिकाऱ्यांनी बाहेर जाण्यास सांगितल्यावर ते आदेश पाळले पाहिजे. प्रशासनाने त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर माहिती त्यांना कागदपत्रांसह दिलेली आहे, असे असतानाही ते खोटी माहिती सभागृहात देत होते. याप्रकरणात आयुक्तांनी ५६ लोकांची सुनावणी घेतली आहे. त्यावर आदेश होणार आहे. : समीर राजूरकर, महापौर.
Read About : Samruddhi Expressway Accident – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने 22 हून अधिक वाहनांना दिली धडक, अनेक जण जखमी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.