एमएमआरडीएच्या दोन पायाभूत प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण
मुंबई : MMRDA Project – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गुरुवारी दोन प्रकल्पांचे सादरीकरण केले. वांद्रे-वरळी सागरी सेतू ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल – 2 व्हाया बीकेसी आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी एकात्मिक रस्ता भुयारी प्रणालीचा त्यात समावेश आहे. तसेच, मुंबई ते वाढवण जोडणी प्रस्थापित करण्यासाठी उत्तन (भाईंदर) ते विरार मार्गाचा सुधारित आराखडाही एमएमआरडीएने सादर केला. या दोन प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) तसेच मुंबई-वाढवण द्रुतमार्ग जोडणीसंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक आणि गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदि उपस्थित होते.
बीकेसी आणि विमानतळ थेट जोडणी
एमएमआरडीएच्यावतीने सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीतील एका दिशेचा मार्ग सुमारे 31 किलोमीटरचा असून या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी आणि विमानतळाला थेट जोडणी मिळेल.
आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा
मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीच्या भाईंदर/उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. यासंदर्भात या मार्गाच्या आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
या प्रस्तावित मार्गांमुळे मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार असून मुंबईतील प्रवास कमीत कमी वेळात होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
Read About : Giant Baobab Trees – 5 महाकाय बाओबाब झाडे वाचवण्याची धडपड
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.