Ad Advertisement Ad Advertisement

Electricity Theft – थकबाकीपोटी खंडित वीजपुरवठा परस्पर जोडला

१७ ग्राहकांवर पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : Electricity Theft – वीजबिलाच्या थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा बेकायदेशीररीत्या परस्पर जोडणाऱ्या व मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या शहरातील १७ जणांवर पोलिसांत वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.


रॉयल पार्क, चिकलठाणा येथील विजय वानखडे, गारखेडा परिसरातील माऊलीनगरमधील कविता जयस्वाल, राजनगर, मुकुंदवाडीतील विमल भांबरे, लखन काळे, प्रकाशनगरातील निर्मला कदम, गंगूबाई कांबळे, चंद्रकला जैवाळ, शंकर दिघोळे, अनिल बाविस्कर, शुभम तेतवार, विनायक कॉलनीतील विजय कमला, संतोषी मातानगरातील फकरू बशीर शेख, अंबिकानगरातील आफरीन बेगम अनिस पठाण, अस्लम मन्सूर पठाण, मुकुंदवाडी, सिडकोतील जी. व्ही. गायकवाड, गुरुदत्त नगरातील विजय गवई व जुना बीड रोड, चिकलठाणा येथील अर्जुन बकाल या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी महावितरणच्या पथकाने काही दिवसांपूर्वी तात्पुरता खंडित केला होता.

महावितरणचे सहायक अभियंता ज्ञानोबा राठोड व त्यांचे सहकारी तपासणीसाठी गेले असता या ग्राहकांनी वीजबिलाच्या थकबाकीपोटी अधिकृत वीजजोडणी खंडित असतानाही परस्पर अनधिकृत जोडणी करून वीज वापरल्याचे आढळले. तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरण्याचे प्रकारही निदर्शनास आले. सहायक अभियंता ज्ञानोबा राठोड यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात सर्व १७ आरोपींवर भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. महावितरणने वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात धडक मोहीम सुरू केलेली आहे. बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून, कारवाई केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित आहे की नाही, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी महावितरणने स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. वीजपुरवठा परस्पर जोडल्याचे आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले जात आहेत. अनधिकृतपणे वीज जोडताना जीवघेण्या अपघाताचा धोका आहे. त्यामुळे कुणीही बेकायदेशीररीत्या परस्पर वीजपुरवठा जोडू नये. वीज खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृत वीज देऊ नये. नसता त्यांचीही वीज खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

Read About : Bomb Threat Email Maharashtra – महाराष्ट्रातील 8 हून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.